युतीबाबत मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चेची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांत चर्चा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मुंबई - महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांत चर्चा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 297 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी दोन-तीन दिवसांतच राज्यभरात आचारसंहिता लागू होईल. नुकत्याच झालेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका भाजपने जिंकल्यानंतर या निवडणुकांमध्येही शत-प्रतिशत भाजप करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र मुंबई, ठाण्यासह किमान शहरी भागात युती होण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

या निवडणुकीमध्ये भाजपने पहिला क्रमांक पटकावला असून सर्वात जास्त नुकसान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या तरी शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचे नुकसान झाले असले तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत कॉंग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. नगरपालिकांच्या नंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि दहा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई आणि ठाणे महापालिकेचा समावेश आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली असून दोन्ही कॉंग्रेस आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वेळचे संख्याबळ राखण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर आव्हान आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर पक्षाचा झेंडा उंचावत ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अनेक वर्षांपासून मुंबई, ठाण्यात सत्ता असणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे, तर गेल्या निवडणुकीतील ताकद कायम ठेवण्याचे आव्हान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही असल्याचे समजते. यामुळे दोन्ही पक्षांचा फायदा होणार असल्याने प्रमुख नेत्यामंध्ये काही दिवसांतच चर्चा सुरू होईल. प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्या स्तरावरच युती होणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता असल्याने या दोन नेत्यांमध्ये चर्चेची पहिली फेरी येत्या दोन दिवसांत होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली.

Web Title: uddhav thackeray & devendra fadnavis discussion about alliance