
Uddhav Thackeray : 'या' मुद्द्यावरून उद्धव यांचा राहुल गांधींना थेट इशारा; म्हणाले, सहन करणार नाही
मालेगाव - उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांचा उल्लेख करत लोकशाही वाचविण्याच्या लढाईत आम्ही सोबत असल्याचं म्हटलं. त्याचवेळी त्यांनी राहुल यांना इशाराही दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पाहिली. राहुल यांनी प्रश्न विचारला की, २० हजार कोटी रुपये कोणाचे? यावर भाजपकडे उत्तर नाही. हिंडेनबर्गने हजारो कोटींचे घोटाळे बाहेर काढले. त्यावर पंतप्रधान उत्तरही देत नाही. पण साध्या-साध्या घोटाळ्यांसाठी आपल्याकडे ईडी, सीबीआय आणलं जातं. मात्र हजारो कोटींच्या घोटाळ्यावर काहीच बोलत नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधींना मला एक सांगायचं की, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत गेला. आम्ही तुमच्यासोबत होतो. ही लढाई लोकशाहीसाठीची आहे. पण सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही उद्धव यांनी राहुल गांधींना दिला. स्वातंत्र्य लढ्यासाठी सावरकरांनी १५व्या वर्षी शपथ घेतली होती. त्यांनी जे केलं, ते येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यांनी १४ वर्षे छळ सोसला, असंही ते म्हणाले.
दरम्यान आपण देशाचं संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्याला आता फाटे फुटू देऊ नका. तुम्हाला डिवचलं जातं. मात्र आता वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशाराही उद्धव यांनी दिला.