उद्धवजी, खिशातले राजीनामे तरी द्या - सुप्रिया सुळे

उद्धवजी, खिशातले राजीनामे तरी द्या - सुप्रिया सुळे

सासवड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वडिलांचे स्मारक बांधता आले नाही आणि ते निघाले राममंदिर बांधायला. दुष्काळ पडलाय त्याच्यावर बोलायला वेळ नाही अन्‌ मंदिरे कुठली बांधता. खिशात फाटलेले राजीनामे एकदा द्या तरी, होऊ द्या निवडणुका. कोण कोणाबरोबर जातेय ते दिसेल, असे जाहीर आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील नगरपालिका चौकातून तहसील कार्यालयापर्यंत बुधवारी (ता. २४) जाहीर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सुळे बोलत होत्या. या वेळी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन दिले.  

सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली. देशाबाहेरील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख येणार होते. शेतीमाल बाजारभाव पाडून शेतकऱ्यांचे १५ लाख घालविले. लोक आता हेच बोलू लागलेत. मुख्यमंत्री जिथे जातील तिथे ते भारनियमनाची भेट देतात. यांच्या राज्यात भाजप व शिवसेना कार्यकर्ते कायदा सुव्यवस्था बिघडवतात व हेच मुख्यमंत्री गृहखाते सांभाळताना यांना क्‍लीन चिट देतात, अशी टीका सुळे यांनी केली. 

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, गौरी कुंजीर, जाधव, बबन टकले, बंडूकाका जगताप, संतोष जगताप, भानूकाका जगताप, शिवाजी पोमण, विराज काकडे, सारिका इंगळे, ऋतुजा धुमाळ, दत्ता चव्हाण, बापू कटके, अरुणअप्पा जगताप, महेश जगताप, हेमंतकुमार माहूरकर, पूजा भिंताडे, भय्या खैरे, एम. के. गायकवाड, मानसी जगताप, कला फडतरे उपस्थित होते. 

शिवतारे यांच्यावर कामठे यांची टीका
राष्ट्रवादीचे नेते जालिंदर कामठे यांनी पुरंदरचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता टीका केली. गुंजवणी धरणाचे पाणी आले नाही. चारपदरी रस्ता यांना करता आला नाही. मंतरवाडीचा रस्ता सुप्रिया सुळे यांना करावा लागला. पाणी योजना नीट चालत नाहीत. यांचे पुरंदर-हवेली मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले आहे. यांना धडा शिकवा, असे कामठे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com