Shivsena : ठाकरेंनी मुंबईत फुंकले रणशिंग! पुण्यात उमटले पडसाद Uddhav Thackeray group slogans against Chief Minister Eknath Shinde at Shiv Sainik Road in Pune after Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

Shivsena : ठाकरेंनी मुंबईत फुंकले रणशिंग! पुण्यात उमटले पडसाद

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा निर्णय झाला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. अशात सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे मात्र चोर तो चोरच असतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आज मातोश्रीबाहेर उभं राहूनही त्यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे.

तर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेरुन शिवसैनिकांना संबोधित केलं. या चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही, त्यामुळं आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, असं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदयाला केलं.

त्यानंतर मुंबई पाठोपाठ पुण्यातही शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील झाशीच्या राणी चौकात ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काल घेतला आहे. त्यामुळे आज मुंबईसह पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. हातात मशाल आणि भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.