मराठा आरक्षण: उद्धव आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

व्यंग्यचित्रकाराने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे. शिवसेना मराठा आरक्षणासाठी आग्रही आहे. जाधव, रायमूलकर, खेडेकर यांनी पक्षप्रमुखांसोबत चर्चा केली आहे. चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. शिवसेना आमदार व खासदारांनी राजीनामे दिलेले नाहीत. 
- सुभाष देसाई, शिवसेना नेते.

मुंबई - शिवसेनेच्या "सामना‘ या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंग्यचित्रामुळे निर्माण झालेल्या वादातून पाठ सोडवून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्याची शक्‍यता आहे. ते राज्यपालांचीही भेट घेण्याची शक्‍यता आहे. 
 

"सामना‘तील वादग्रस्त व्यंग्यचित्रामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. या प्रकरणी उठलेल्या वादळामुळे उलथापालथ होण्याची शक्‍यता होती. विरोधकांनी शिवसेनेला मराठाविरोधी ठरवले. पक्षाचे एक खासदार आणि तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. या वादातून सुटका करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या वेळी मराठा मोर्चाबाबत ते शिवसेनेची भूमिका मांडण्याची शक्‍यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही ते भेट घेण्याची शक्‍यता आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून यापूर्वीच ठाकरे यांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. मात्र, या मोर्चाबाबत आणि आरक्षण, तसेच इतर मागण्यांबाबत शिवसेनेची भूमिका मांडली नव्हती. आता व्यंग्यचित्र प्रकरणामुळे शिवसेना भूमिका जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 
 

समजूत काढली; पण नाराजी कायम 
या व्यंग्यचित्रामुळे नाराज झालेले बुलडाण्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पक्षप्रमुखांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे मंगळवारच्या रात्रीपासून "मातोश्री‘वर खलबते सुरू होती. या तिघांसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळी तातडीने बैठक बोलावण्यात आली. या वेळी राजीनामा दिलेल्यांची समजूत काढण्यात आली. मात्र त्यांनी राजीनामे दिलेले नाहीत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. शिवसेना या तिघांची नाराजी दूर करू शकली असली, तरी अनेक आमदार व पदाधिकारी या व्यंग्यचित्राबाबत खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. 

Web Title: Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis