दिल्लीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा; उद्धव ठाकरे- सोनिया गांधी यांची भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 February 2020

सीसीए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यावर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका थोडी वेगळी असली तरी राज्यातील सरकार चालविताना किमान समान कार्यक्रमावर भर देण्याबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल दिल्लीत चर्चा झाल्याचे शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

मुंबई - सीसीए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यावर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका थोडी वेगळी असली तरी राज्यातील सरकार चालविताना किमान समान कार्यक्रमावर भर देण्याबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल दिल्लीत चर्चा झाल्याचे शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमुळे राज्यातील कोणत्याही नागरिकाचे अधिकार हिरावले जाऊ नयेत, म्हणून पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्यावर राज्य समन्वय समिती निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना शुक्रवारी आश्वस्त केल्याचे या नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल प्रथमच भेट घेतली. तासभर चाललेल्या या बैठकीला प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे या वेळी आभार मानले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावरच वाटचाल करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत उत्तम समन्वय असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. 

ठाकरे यांनी नवीन कायद्याचा योग्य अभ्यास करावा ः तिवारी 
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएचा योग्य अभ्यास करावा, असा सल्ला कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचे समर्थन करू नये, असे म्हटले आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्‌विट करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे हे समजून घेण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायद्याची माहिती घेणे आवश्‍यक आहे. एकदा आपण एनपीआर लागू केल्यास आपण एनआरसी रोखू शकत नाही. तसेच भारतीय राज्यघटनेनुसार सीएएकडे पाहायला हवे, कारण धर्म हा नागरिकत्वाचा आधार असू शकत नाही, असे मनीष तिवारी म्हणाले. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे विचार वेगळे असले तरी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार काम करेल. 
बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray meets Sonia Gandhi