
पुन्हा चर्चा मुदतपूर्व निवडणुकीची
मुंबई : राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही येत्या जानेवारी महिन्यात निवडणुका होतील, असे संकेत दिले. त्यामुळे मुदतपूर्वचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परळमधील कोकण महोत्सवाला आज राज ठाकरे यांनी भेट दिली होती, तिथे ते बोलत होते.
मात्र, राज ठाकरे यांच्या वक्तव्यातून नेमक्या कोणत्या निवडणुका हे स्पष्ट झालेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. राज ठाकरे यांच्या हालचाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनीच आता येत्या जानेवारीत निवडणुकांचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे म्हणाले की, घशाला सध्या आराम देतोय. निवडणुका लागतील, त्यामुळे जानेवारीमध्ये बोंबलायचंच आहे. घसा आपला असतो तर गळा लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या लोकांचा असतो. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून राज्यात जानेवारीमध्ये निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र या निवडणुका मुंबई महापालिकेच्या असतील की विधानसभेच्या , हे राज ठाकरेंनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जानेवारीत नेमक्या कोणत्या निवडणुका लागणार याची चर्चा रंगू लागली आहे.
‘दिल्लीमध्ये निवडणुकांची तयारी सुरू’
‘‘एका बाजूला राज्यात मुदतपूर्व निवडणुका घेण्याची दिल्लीत तयारी सुरू असून दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. देशाच्या नकाशावरून महाराष्ट्राला नष्ट करण्याचे हे कारस्थान असून हे रोखायचे असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्यावर एकत्र आले पाहिजे. त्याचबरोबर राजकारणात सध्या सुरु असलेली चिखलफेक बंद होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी,’’ असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.
ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच आहेत. त्यांनी रविवारी राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की सध्याची राजकीय चिखलफेक थांबवून महाराष्ट्राचा विचार करण्याची गरज आहे. एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प राज्याबाहेर चालले आहेत. याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र बसले पाहिजे.