मालेगावात उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत पोस्टर; चर्चेला उधाण | Urdu Banner in Malegaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urdu Banner in Malegaon

मालेगावात उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत पोस्टर; चर्चेला उधाण | Urdu Banner in Malegaon

नाशिक : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी अनेक बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या. तर काही दिवसांपूर्वी खेड येथे त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर चांगलेच ताशेरे ओढले. त्यानंतर सध्या मालेगावमध्ये लागलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा आहे.

दरम्यान, खेडच्या सभेनंतर मालेगावमध्ये त्यांची सभा होणार असून त्यासाठी उर्दू भाषेत पोस्टर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत.

पण पोस्टरवरील उर्दू भाषेवरून हे पोस्टर चर्चेत आहे. त्याचबरोबर या पोस्टरवर भगवा झेंडा असून भगव्या रंगामध्ये काही शब्द लिहिण्यात आले आहेत.

सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असून मनसेच्या राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतर आता मालेगावमध्ये अनेक ठिकाणी उर्दू भाषेत बॅनर लावले असून उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मुस्लीम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे असं अवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, या पोस्टरवरून शिंदे गटाच्या आणि भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली असून शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "ह्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??" अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.