
Uddhav Thackeray : धनुष्यबाण चोरला तरी राम माझ्यासोबत; उद्धव ठाकरे
मुंबई : ‘‘काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत”, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. लोकशाही वाचवणे हे केवळ माझ्या एकट्याचे काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही.
आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का?” असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन आता दगड राजकारणात तरंगताहेत आणि दगडच राज्य करत असल्याचा टोला ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारला मारला. मुंबईत ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी रामनवमीनिमित्त शिवसैनिक थेट रामटेकहून मुंबईपर्यंत पायी चालत आले होते.
त्यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, रामटेक ते इथपर्यंत पायी येण्याची हिंमत तुम्ही दाखवली. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात, हीच माझी ताकद आहे. धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत. हे सगळी ब्रह्मास्र माझ्याबरोबर आहेत,”असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दगडच तरंगताहेत आणि दगडच राज्य करताहेत
भाजप आणि शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटावर टीका करताना ठाकरे म्हणाले, तेव्हा प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन दगड टाकला, तरी तो तरंगायचा. आता राजकारणात प्रभू रामाचे नाव घेऊन दगड तरंगताहेत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते. आता दगडच तरंगताहेत आणि दगडच राज्य करतायत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचे काय? ते रामभक्तांचे काम मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्यासाठी आशीर्वाद
ठाकरे म्हणाले, ‘‘एका दृष्टीने पाहिले, तर असे कुणीतरी कुणासाठीतरी इतके किलोमीटर पायपीट करत येणे आताच्या काळात अशक्य आहे. रामटेकमधून निघून तुम्ही राम नवमीला इथे पोहोचलात हा माझ्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.