Uddhav Thackrey: '…मोठ्या प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा का थांबवल्या', उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackrey

Uddhav Thackrey: '…मोठ्या प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा का थांबवल्या', उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

राज्यात भाजपाविरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभांच्या माध्यमातून चांगली आघाडी दाखवली होती. राज्याच्या विविध भागांत सुरू असणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर या सभेतून महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील ऐकी दिसून येत होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील वज्रमुठ सभा रद्द करण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा जाहीर केल्यामुळे वज्रमुठ सभा रद्द करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील वज्रमुठ सभा स्थगित करण्यामागचं नेमकं कारण उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'वज्रमुठ सभा ह्या मे महिना आणि जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत घेण्याचं नियोजन होतं. त्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. मा्त्र या सभा संध्याकाळी जरी घेतल्या जात असल्या तरी दुपारपासून लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जे काही घडलं. त्या पार्श्वभूमीवर सभा सुरू ठेवणं योग्य ठरलं नसतं', असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही, त्याबाबतची काळजी मी घेईन, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.