'शिवसेना' हातातून जाताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; 'मातोश्री'वर बोलावली तातडीची बैठक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं उद्धव ठाकरेंसमोर मोठं संकट उभं राहिलंय.

'शिवसेना' हातातून जाताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; 'मातोश्री'वर बोलावली तातडीची बैठक!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगानं (Election Commission) काल (शुक्रवार) निकाली काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय आयोगानं घेतला, त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या आधी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळं मोठा दिलासा मिळालाय.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं उद्धव ठाकरेंसमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर एक बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज कोणता मोठा निर्णय घेणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी 1 वाजता मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलीये. या बैठकीला आमदार आणि खासदारांनाही बोलावण्यात आलंय. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतंय. यावेळी निवडणूक आयोगानं कशाच्या आधारावर पक्षाचं चिन्हं आणि नाव शिंदे गटाला दिलं. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलं.