शेतकऱ्यांना एकदातरी पूर्ण कर्जमुक्त करा: उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

काश्‍मीर शांत होत नाही, तोपर्यंतच छत्तीसगडमध्ये हल्ला झाला. तुम्हाला वाटेल मी कुचेष्टेने बोलतोय; पण काश्‍मीर, छत्तीसगडमध्ये नोटबंदी झाली नसेल कदाचित! 
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख

मुंबई : 'राज्यातील शेतकरी हा परिस्थितीची शिकार झाला आहे. शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे,' अशी आग्रही मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) केली. तूर खरेदीच्या मुद्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले, असेही ठाकरे म्हणाले. 

'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे म्हणाले, "आम्ही शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला. याबद्दल त्यांचे आभार! 'आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी मदत करा' अशा आशयाची एक बातमी वाचली. एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये, यासाठी काम करायला हवे. सध्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. वास्तविक, ही गोष्ट इतकी ताणण्याची गरज नव्हती. शेतकरी रस्त्यावर उतरले, तेव्हाच सरकारने याची दखल घ्यायला हवी होती. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणारच नाही, असा राज्य सरकारचा कारभार असला पाहिजे.'' 

यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी ठाकरे यांनी सुचविले होते. याविषयी ते म्हणाले, "मोहन भागवत यांचे नाव मनापासून आम्ही सुचविले आहे. अनेक वर्षांनी अशी एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे कणखर आणि खंबीर उमेदवार असेल, तर त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी का सुचवायला नको? 'हिंदुराष्ट्र संकल्पने'साठी भागवत हेच लायक का नसावे? इतर सर्व ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते; मग देशाचे नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही.'' 

Web Title: Uddhav Thackray demands complete loan waiver for farmers