
Uddhav Thackrey: कर्नाटकच्या शपथविधीला ममतांपाठोपाठ उद्धव ठाकरे गैरहजर; चर्चांना उधाण
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर आज कर्नाटकात सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. तसेच डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित असणार आहेत. परंतु ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याजागी ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहणार नसल्याचं समजलं. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
"राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर, महाराष्ट्राचा भाग मागायला गेलेत"
'राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. या संदर्भात ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसं पत्र देखील आणतील. आमचं सरकार होतं, तेव्हा तिथे भाजपचं सरकार असल्याची ओरड ते करत होते', असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी बोलताना लगावला आहे.