शिवसेना-राष्ट्रवादीच्या शोधमोहिमेला यश; उदगीरचे आमदार अखेर सापडले!

Sanjay-Bansode-MLA-NCP
Sanjay-Bansode-MLA-NCP

मुंबई : आज सकाळी अर्धा महाराष्ट्र जागा झाला नव्हता, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण राज्यात एकच गोंधळ उडाला. 

सकाळी सुरू झालेल्या या राजकीय घडामोडी उत्तरोत्तर वेगाने वाढू लागल्या. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला एकूण प्रकार सांगितला. आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवारांसोबत बंडखोरी केल्यावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांपैकी उदगीर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांनी शोधून काढले आहे. 

सकाळपासून गायब असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे यांचा समावेश होता. यापैकी बनसोडे हे मुंबईहून विमानाने दिल्लीला जाणार आहेत, अशी चर्चा माध्यमांमध्ये फिरत होती. तसेच सोशल मीडियावरूनही अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. 

मात्र, सकाळपासून नॉटरिचेबल असलेल्या बनसोडे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत आहोत, अशी माहिती 'सकाळ'ला दिली होती.

मात्र, सकाळपासून नॉटरिचेबल असलेल्या आमदारांच्या शोधमोहिमेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी सुरवात केली होती. या शोधमोहिमेस सायंकाळी यश आले. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी एकत्रित केलेल्या शोधमोहिमेत सकाळपासून गायब असलेल्या बनसोडे आणि पाटील यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. आणि त्यांना घेऊन ते थेट वाय.बी.सेंटरवर दाखल झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com