उजनी आठ महिन्यांनी पुन्हा शून्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नियोजन चुकल्याचा आरोप; 201 दिवसात संपले 111 टक्के पाणी

नियोजन चुकल्याचा आरोप; 201 दिवसात संपले 111 टक्के पाणी
सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा बुधवारी शून्यावर आला. मागील वर्षी 6 ऑगस्टला धरणातील पाणीसाठा शून्यावर आला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच जवळपास 265 दिवसांनी धरण पुन्हा शून्यावर आले आहे. यंदाच्या हंगामात उजनी धरणाच्या पाणी वाटपाचे नियोजन चुकल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर केला आहे.

धरण 2 ऑक्‍टोबर 2016 ला धरण शंभर टक्के भरले होते. धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची 8 ऑक्‍टोबर 2016 ला टक्केवारी 111.28 टक्के इतकी होती. 8 ऑक्‍टोबर 2016 ते 27 एप्रिल 2017 या 201 दिवसामध्ये धरणातील तब्बल 111 टक्के पाण्याचा वापर करण्यात आला आहे. हे 111 टक्के पाणी म्हणजेच 59.62 टीएमसी पाणी होय.
मागील वर्षी 6 ऑगस्टला धरण शून्य टक्के झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरवात होऊन धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती. त्यानंतर जवळपास दोन महिन्याच्या कालावधीत धरणात 100 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. उजनी धरणातून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले होते. त्या वेळी पाण्याची मागणी नसतानाही ते सोडल्यामुळे अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र, पाणी सोडणे कसे योग्य आहे, याचा खुलासा अधिकाऱ्यांनीही केला होता.

आकडे बोलतात
सर्वांत कमी पाणीसाठा उणे 53.43 टक्के - 4 जुलै 2016
धरण शून्य टक्‍क्‍यावर आले - 6 ऑगस्ट 2016
धरणातील पाणीसाठा 100 टक्के झाला - 2 ऑक्‍टोबर 2016
धरणात सर्वाधिक 111 टक्के पाणीसाठा झाला - 8 ऑक्‍टोबर 2016
धरण पुन्हा आले शून्यावर - 27 एप्रिल 2017
कालव्यातून विसर्ग सुरू - 3 हजार 300 क्‍युसेक

Web Title: ujani dam after zero at eight month