उजनी उद्या भरणार, पंढरपुरात पुराच्या पाण्यात होणार वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

 - उजनी धरण 94 टक्के भरले असून, बुधवारी ते पूर्ण भरण्याची शक्‍यता

- पंढरपुरात भीमा नदीतून बुधवारी सकाळी सुमारे सव्वादोन लाख क्‍युसेक पाणी वाहणार.

पुणे : उजनी धरण 94 टक्के भरले असून, बुधवारी ते पूर्ण भरण्याची शक्‍यता आहे. उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे पंढरपुरात भीमा नदीतून बुधवारी सकाळी सुमारे सव्वादोन लाख घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक) पाणी वाहणार आहे. पंढरपुरात भीमा नदीतून मंगळवारी सायंकाळी एक लाख 44 हजार क्‍युसेक पाणी वाहात आहे. 

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे, बहुतेक धरणे भरली असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत होते. त्यामुळे, उजनी धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दोन तीन दिवसांत वेगाने वाढ झाली. उजनी धरणातून आज सकाळी एक लाख क्‍युसेक पाणी सोडण्यास सुरवात झाली, ते दुपारपासून दीड लाख क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आले. 

पुण्यातून धरणात सोडण्यात येणारे पाणी दौंडपर्यंत एकत्रित होत दोन लाख 16 हजार क्‍युसेकने उजनी धरणाच्या जलाशयात जमा होत आहे. त्यामुळे, धरणातील पाणीसाठा वाढू न देण्यासाठी उजनीतून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली. त्याचवेळी नीरा खोऱ्यातील पावसाचा जोर ओसरल्याने, वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. वीर धरणातून सकाळी सुमारे एक लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात येत होते, ते प्रमाण आज सायंकाळी 62 हजार क्‍युसेक करण्यात आले. 

उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी नीरा नरसिंगपूर येथे भीमा व नीरा नदीच्या संगमावर एकत्र येते. तेथील पाण्याचा वेग मंगळवारी सायंकाळी दोन लाख 22 हजार क्‍युसेक आहे. ते पाणी उद्या सकाळी पंढरपूरातून मार्गस्थ होईल. 

पुण्यातील धरणक्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने, धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण आज सायंकाळी कमी करण्यात आले. खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्‍युसेक, घोड धरणातून 22 हजार सहाशे क्‍युसेक, तर चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा या धरणातून एकत्रितरित्या सुमारे अकरा हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

पवना, मुळशी धरणातून पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले आहे. त्यामुळे, उद्यापासून उजनी धरणाच्या जलाशयात जमा होणाऱ्या पाण्याचे प्रमाण सध्याच्या तुलनेत कमी असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujani Dam will be Full Tomorrow Increasing Flood water at Pandharpur