भाजपने राणेंना गाजर दाखविले- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

उमरी (जि. नांदेड) - 'भाजप सरकार हे फसवी आश्वासने देणारे आहे. नारायण राणे यांनाही या पक्षाने गाजर दाखविले. त्यामुळे त्यांची अवस्था "ना घर का, ना घाट का' अशी झाली आहे. खरे तर भाजपचे "कमळ' हे चिन्ह बदलून "गाजर' हे निवडणूक चिन्ह ठेवायला हवे,'' अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. उमरी (जि. नांदेड) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते.

'शिवसेनेत राणेंचे वजन होते. कारण बाळासाहेबांसारखे निडर नेते त्या वेळेस शिवसेना सांभाळत. आता उद्धवरावांना बाकीच्यांवर धाक बसविणे तर दूरच ते स्वतःच दुसऱ्यांना भीत आहेत. कंधारचे शिवसेना आमदार खुलेआम भाजपच्या कार्यक्रमात स्टेजवर दिसत आहेत तरी उद्धवरावांचा पारा चढत नाही. जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते राज्य कसे सांभाळतील,'' असा सवाल श्री. पवार यांनी उपस्थित केला. "राणेंना कॉंग्रेस सोडायला लावली. त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी झाली. त्यांना मंत्रिपदासाठी गाजर दाखविले. आता नारायण राणेही "माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका. मला मंत्री करा,' असा दम देत आहेत. राणे हे एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री होते. आता ते मंत्रिपदासाठी फडणवीस सरकारच्या मागे फिरत आहेत,' असे पवार म्हणाले.

कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे मंत्री म्हणून अनेक निर्णय घेतले. 71 हजार कोटींची कर्जमाफी त्यांनी केली होती. त्याउलट आताच्या सरकारमध्ये देशाचे कृषिमंत्री राधामोहनसिंह यांचे नाव कधी, कुठे ऐकले आहे का? अशी अवस्था देशात व राज्यातील मंत्र्यांची झाली असल्याची टिप्पणीही पवार यांनी केली.

Web Title: umari nanded news ajit pawar comment on narayan rane