हुंडा नको मामा! मला फक्त मुलगी द्या..!!

representational image
representational image

खामखेडा (नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात तरुणांच्या विवाहाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कर्तबगार व नोकरदारांचेच विवाह योग्य वयात होऊ लागले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुखी संसाराची स्वप्ने बाळगून असलेले बेरोजगार तरुण पस्तीशी पार करू लागले, तरीही लग्नाच्या बाजारात त्यांना कोणीही विचारायला तयार नाही. काहीही असो.. वधूपित्याला चांगले दिवस आले आहेत, तर विवाहइच्छुक तरुणांवर 'हुंडा नको, मामा! फक्त पोरगी द्या मला..'  असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. 

पाच वर्षांपासून परिस्थिती बदलत चालली आहे. रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे बेरोजगार युवकांच्या फौजा वाढत आहेत. जमिनीचे तुकडे कमी कमी होत चालले, नोकरी नाही, त्यामुळे विवाहयोग्य वय होऊनही घरी विवाहासाठी वधूपिता फिरकेना, अशी वेळ गावागावातील अनेक तरुणांवर आली आहे. साधी विचारपूसदेखील कोणी करत नाही. पस्तिशी पार होऊनही विवाह होत नसल्याने तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. विवाह वंचित तरुणांच्या टोळकी सध्या सर्वत्र वावरतांना नजरेस पडू लागल्या आहेत.

शिक्षणात मुली ठरताहेत अग्रेसर
सध्या मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये जागरूकता आलेली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी 'मुलगी हे परक्‍या घरचे धन' आणि 'चूल आणि मूल सांभाळण्यासाठी' अशी मुलीच्या बाबतीत धारणा होती. त्यामुळे तिच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले जात नसे. परंतु काळ बदलला आणि मुलांच्या तुलनेत मुली शिक्षणात अग्रेसर राहू लागल्या. विवाहयोग्य वयात आल्यानंतर मुली 'आपल्यापेक्षा कमी शिकलेला नवरा नको बाई' असे हक्काने आईला म्हणू लागल्या आहेत.

एवढे परिवर्तन समाजात घडले आहे. त्यामुळे शिक्षकाची पत्नी शिक्षिका, डॉक्‍टरची पत्नी डॉक्‍टर, प्राध्यापकाची पत्नी प्राध्यापिका, परिचारकाची पत्नी परिचारिका, असे चित्र आज अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. 

हुंडा नको, मामा! फक्त पोरगी द्या मला..
हॉटेल, पानटपरी, ढाबे, परमीट रूम आदी ठिकाणी तरुणाई मित्र-मंडळींशी मनातील दुःख व्यक्त करू लागली आहे. एवढा हुंडा व अमुक तोळे सोने घेतल्याशिवाय विवाह जमणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या वरपित्याला आज फुकटात कोणी पोरगी देतो का? असे म्हणत मुलगी शोधण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या बापापुढे जात  ''हुंडा नको, मामा  फक्त पोरगी द्या मला ‘‘ अशी विनवणी विवाह इच्छुक तरुणांकडून  थेट वधूपित्याकडे होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com