‘किंगमेकर’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मुंबईचा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Union Home Minister Amit Shah will visit Mumbai politics

‘किंगमेकर’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मुंबईचा दौरा

मुंबई : शिवसेनेतील बंडाचे ‘किंगमेकर’ ठरलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबईत येणार असून, खास गणेशोत्सवासाठी शहा हे येत्या ५ सप्टेंबरला मुंबईत येणार असले; तरी ते नव्या राजकीय गणितांची जुळवणूक करणार असल्याचे स्पष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद हिसकावून घेतल्यानंतर मुंबई महापालिकाही ताब्यात घेण्याची रणनीती शहा आखण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांच्या या मुंबई दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य राहणार आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यांत राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडाचा झेंडा घेऊन भाजपचे तंबू गाठले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यामागे शहा यांचीच खेळी असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर विश्वासघात केल्यानेच शिवसेना फोडल्याचे भाजप नेत्याकडून उघडपणे सांगण्यात आले. एवढ्यावर न थांबता आता शिवसेनेच्या चिन्हावर ताबा मिळविण्याच्या लढाईत भाजपने आपली ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लावली आहे. या काळात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला जात आहे.

राज्यातील सरकार उलथवून लावल्यानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा भाजप, विशेषत: शहा यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच शिवसेनेला अंगावर घेणारे आणि मुंबईतील प्रभागरचनेची खडानखडा माहिती असलेले आशिष शेलार यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मुंबई दौऱ्यात शहा शेलार यांची भेट घेऊन काही टिप्स देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी नेमलेल्या समितीतील नेत्यांसोबतही शहा चर्चा करतील. तर प्रदेश पातळीवरील काही नेत्यांचीही ते बैठक घेण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तार ९ तारखेला?

विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने नव्या मंत्र्यांच्या नावांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पहिल्यांदा डावलले आणि नाराज असलेल्या काहींना कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यातही मंत्रिपद मिळविण्यासाठी अनेकांनी लॉबिंग केले असल्याने कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे. या सरकारच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारात १८ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला.

Web Title: Union Home Minister Amit Shah Will Visit Mumbai Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..