चंदू चव्हाणांच्या घरी पुण्यातील तरुणांनी उभारली शौर्याची गुढी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

"भारत माता की जय', "वंदे मातरम'च्या घोषणा... भारावलेले वातावरण.... शौर्याची गुढी.... उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू.... असे चित्र आज दिसले धुळ्याजवळील बोरविहीर गावातील भारतीय शूर सैनिक चंदू चव्हाण यांच्या घरी. साऱ्यांचेच मन हेलावून टाकणारा हा क्षण.

धुळे - "भारत माता की जय', "वंदे मातरम'च्या घोषणा... भारावलेले वातावरण.... शौर्याची गुढी.... उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू.... आज हे चित्र दिसले धुळ्याजवळील बोरविहीर गावातील भारतीय शूर सैनिक चंदू चव्हाण यांच्या घरी. साऱ्यांचेच मन हेलावून टाकणारा हा क्षण. तो साकारला गेला पुण्यातील तरुण कार्यकर्ता अमित बागुल याच्यामुळे.

गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील अमित बागुल व सहकारी गुढी उभारण्यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यापासून 400 किलोमीटर अंतरावरील धुळे गाठले. चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडून तब्बल 124 दिवस अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवले. त्यांचे आतोनात हाल केले. मात्र हा शूर योद्धा डगमगला नाही. अत्याचारापुढे झुकला नाही. अखेर भारत सरकारच्या प्रयत्नामुळे पाकिस्तानला त्याची सुटका करावी लागली. अशा या शूर योद्‌ध्याच्या घरी जाऊन पुण्यातील अमित बागुल व सहकाऱ्यांनी तेथे शौर्याची गुढी उभारून खऱ्या अर्थाने गुढीपाडवा साजरा केला .

धुळे येथून 20 किलोमीटरवर असलेल्या बोररविहीर या गावी शूर सैनिक चंदू चव्हाण, त्यांचे बंधू भूषण चव्हाण, आजोबा, घरातील इतर मंडळी यांच्यासह गावातील शेकडो ग्रामस्थ आणि औत्सुक्‍याने जमलेले पत्रकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गुढीवर "सलाम तुमच्या कर्तुत्वाला!' असा फलक लिहिला होता. सजवलेली गुढी टाळ्यांच्या कडाडत उभारून मिठाई वाटण्यात आली. "भारत माता की जय', "वंदेमातरम'च्या जय घोषात सारा आसमंत दणाणून गेला. अशी अभिनव गुढी उभारण्याचा उपक्रम यापूर्वी 26/11 च्या दहशदवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी अशोक कामठे, काश्‍मीर येथील कुपवाडा येथे हुतात्मा झालेले कर्नल संतोष महाडिक इत्यादींच्या घरी शौर्य गुढी उभारण्यात आली होती.

या प्रसंगी बोलताना शूर सैनिक चंदू चव्हाण म्हणाले कि, "तुम्ही तरुण देशाची संपत्ती आहेत. ज्यावेळी तुम्ही सैनिकांसाठी अशा प्रकारे कार्य करता, त्यावेळी सैनिकाला आपला देश आपल्याबरोबर आहे असे वाटते आणि त्याला लढण्याची उमेद मिळते.' तर चंदू यांचे आजोबा म्हणाले की, "शूर सैनिक चंदू चव्हाण यांना या शौर्य गुढीतून प्रोत्साहन मिळेल. पुण्याहून अमित बागुल व सहकारी यांनी हा उपक्रम राबवला. तो अत्यंत वाखण्याजोगा आहे. धैर्य वाढविण्यासाठी नवीन वर्षाची गुढी हि नवीन शौर्य येण्यासाठी खूप महत्वाची आहे.' या प्रसंगी बोलताना अमित बागुल म्हणाले की, "आमच्या तरुणांच्या दृष्टीने शूर सैनिक चंदू चव्हाण हे शौर्याचे प्रतीक आहेत. पाकिस्तानमध्ये त्यांना तब्बल 124 दिवस अतोनात यातनांना सामोरे जावे लागले. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा डगमगला नाही. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पुण्याहून येऊन आम्ही येथे शौर्याची गुढी उभारली.

Web Title: Unique celebration of Gudipadwa at Chandu Chavan home