तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

बीडमधील शेतकरी मुलाचे राज्यपालांना पत्र

बीड : शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. हा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा अशी मागणी बीडमधील एका शेतकरी मुलाने राज्यपालांना केली आहे. या शेतकऱ्याच्या मुलाचे पत्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

श्रीकांत विष्णू गदळे असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. श्रीकांत हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील दहिफळ येथे राहतात. ते अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करण्यात यावे. राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा, असं श्रीकांत गदळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी मला मुख्यमंत्री करा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो. माझ्या या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रीकांत यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेले हे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. गदळे यांना बहुजन महापार्टीतर्फे विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी घोड्यावरून प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Until then, make me CM!