सिरॅमिक स्टुडियो ते आमदार : विद्या चव्हाण

Vidya Chavan
Vidya Chavan

वास्तविक जे. जे स्कूल ऑफ आर्टसमधून सिरॅमिक आणि कर्मिशियल आर्टसमध्ये पदवी घेतल्यानंतर मला स्वत:चा स्टुडिओ उभारायचा होता. पण याच काळात देशात- राज्यात धर्माच्या नावाखाली अशा काही घटना घडल्या की आपोआप राजकारणात प्रवेश झाला.

राजकारणात धर्म आला तर गोरगरिबांचे प्रश्‍न सोडवणार कोण? या विचाराने प्रचंड तळमळ व्हायची. राजकारण्यांकडून जनतेचे प्रश्‍न सुटत नाही असे म्हणून ओरड करून चालणार नाही. त्यासाठी स्वत: राजकारणात उतरणे गरजेचे आहे. तरच या प्रश्‍नाची दुसरी बाजू राजकारण्यांच्या नजरेतून दिसेल, समजेल.

प्रश्‍न सोडवायला इतका का वेळ लागतो याचे उत्तर मिळेल, लोकांना ते कारण समजावून सांगता येईल अशा निर्णयाप्रत ज्या दिवशी आले त्या दिवशी मातीकाम-सिरॅमिकचा स्टुडिओ बंद करून सक्रिय राजकारणात प्रवेश घेतला.

बाबरी मशिद पाडण्यात आली होती. राममंदिराच्या मुद्‌द्‌यावर देशात अराजकता पसरली होती. ग्रोधा कांड घडले होते. 'मंदिर वहीं बनायें'गे च्या घोषणांनी संपूर्ण देश, राज्य, शहरे पेटून उठली होती. या मुद्‌द्‌यामुळे राजकारणामध्ये धर्माचा प्रवेश झाला होता. गोरगरिबांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता.

हा हिंदू- तो मुस्लिम अशी समाजाची विभागणी सुरु झाली होती. जागोजागी धर्माच्या नावाखाली मोर्चे निघायचे. या सर्व वातावरणात मन कलुषित होऊ लागले होते. यामुळे माझ्या आयुष्यात नैराश्‍याचे वातावरण पसरले होते.

या काळात मी पार्ल्यात राहत होते. घर सांभाळात माझा कुंभारकामाचा स्टुडिओ पार्ल्यात सुरु होता. अचानकपणे एक दिवस मृणाल गोरें यांच्या संपर्कात आले. त्यानंतर धर्म- राजकारण अशा मुद्‌द्‌यांवर माझ्या त्यांच्याशी चर्चा होऊ लागल्या.

धर्माचे राजकारण कोणीतरी थांबविले पाहिजे या मुद्‌द्‌यावर माझे आणि मृणालताईंचे एकमत होते. त्यांच्यासोबत काही बैठकांना मी हजरही राहिले. पण तोपर्यंत मी राजकारणात येईन असे कधी वाटले नव्हते.

मुळची अत्यंत शांत स्वभावाच्या असलेल्या मला मृणाल ताईंविषयी मात्र, प्रचंड आदर होता. त्या सामान्यांचे प्रश्‍न कसे हाताळतात, कशा बोलतात, लोकांना एखादा मुद्दा कसा पटवून देतात हे पाहणे माझ्यासाठी अभ्यास बनला होता. त्यांच्या या गुणांमुळे मी आपोआप त्यांच्याकडे ओढले गेले होते.

याच दरम्यान राम मंदिरच्या मुद्‌द्‌यावर बोलल्यामुळे पार्ले परिसरात चंद्रकांत देशपांडे वास्तुविशारद (आर्किटेक्ट) यांना विश्‍व हिंदू परिषदेने मारहाण केली. मंगलताई बोरकर यांनी या मुद्‌द्‌यावर साईमंदिरात एक सभा बोलावली होती.

ही सभा उधळायचीच या उेद्‌द्‌शाने विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरजोरात भजन म्हणायला आणि टाळ वाजवायला सुरुवात केली होती. तरीही हट्टाला पेटून, पोलिस बंदोबस्तात दार बंद करून या मंदिराच्या सभागृहात सभा घेतली.

विश्‍व हिंदू परिषदेचा विरोध डावलत, ही सभा घेतली होती. मृणाल गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सभा असल्या की विश्‍व हिंदू परिषदेचे लोक त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न करायचेच. नग्न साधूंचे मोर्चे काढायचे.

सभा, बैठका घ्यायला जमत नसल्याने, शेवटी मृणाल ताईंचा 'टोपीवाला बंगला' हे बैठकीचे ठिकाण बनले. या बंगल्यातून आंदोलनाच्या दिशा ठरत होत्या. मृणालताईंमुळे आपोआप मी समाजाशी जोडले जात होते. राजकारण समजू लागले होते. किंबहुना राजकारणात ओढली जात होते.

याच काळात जळगाव सेक्‍स स्कॅंडल घडले. महाविद्यालयीन मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण याविरोधात कोणी बोलायला तयार होत नव्हते. आम्ही कार्यकर्त्यांनी ग्रुप बनविले होते.

प्रत्येक ग्रुप महाविदयालयात जाऊन विद्यार्थ्यींनीशी बोलत होता. त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न सुरु होता. राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थींनीच्या ग्रुप मिटिंग घेऊन या अन्यायाला वाचा फोडली. शाळकरी- महाविद्यालयीन विद्यार्थींनीना येणाऱ्या अडचणींची माहिती या निमित्ताने खूप जवळून अनुभवता आली.

सधन शिक्षित कुटुंबात जन्म झाल्याने आणि वडील पेशाने न्यायाधीश असल्याने त्यांची सतत बदली व्हायची. या काळात बरीच गावे पाहता आली होती. खूप वेगवेगळ्या गावातालुक्‍यांमध्ये शालेय शिक्षण होत होते. पुढे वांद्रे स्कूल ऑफ आर्टस आणि जेजे स्कूल ऑफ आर्टसमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

त्यावेळी मला जेजे कॉलेज मध्ये शिकविले जाणारे सर्व अभ्यासक्रम करायची इच्छा होती पण काळाच्या ओघात फक्त दोनच पूर्ण झाले. मृणाल गोरे यांच्यामुळे अधिकृतरित्या जनता दलात प्रवेश झाला होता. मृणाल ताईंच्या संगतीत माझ्या राजकीय कारकिर्दीला पैलू पडत होते.

याकाळात आम्ही चैत्यभूमी बचाव साठी मोठे आंदोलन उभे केले होते. वांद्रे वरळी सी लिंकसाठी समुद्रात मोठा भराव टाकला जात होता. यामुळे मँग्रोव्हज नष्ट झाले होते. 'एमएमआरडीए' करीत असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी सुटेल असा दावा सरकार करत होते. पण याचा थेट फटका चैत्यभूमीला बसला होता.

समुद्राच्या लाटांचा थेट मारा चैत्यभूमीला बसत असल्यामुळे संरक्षक भिंतीला तडे पडू लागले होते. सरकारच्या या कृतीविरोधात शाम गायकवाड, व्ही.पी.सिंग यांच्यासोबत आंदोलन उभे केले.

चैत्यभूमी वाचविण्यासाठी पुढे सरकारने समुद्रात ट्रेटापॅड टाकले आणि समुद्र रोखण्याचा प्रयत्न केला. पण 'एमएमआरडीए'च्या या भरावामुळे दादर चौपाटीला मात्र मुंबईकर कायमचे मुकले.

राजकारणातला माझा अधिकृत प्रवेश मृणाल गोरे यांच्यामुळे झाला. त्यावेळी गोरेगाव छोटेसे गाव होते. गोरेगाव समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. प.बा. सामंत, कमल देसाई, आशाताई गवाणकर असे एकाहून एक अग्रणी गोरेगावातलेच किंवा गोरेगावात सक्रिय.

ध्येयासाठी झोकून देऊन आयुष्य पणाला लावलेली ही व्रतस्थ मंडळी. गोरेगावात महिला मंडळ नावाची एक संस्था आहे. 1950 साली स्थापन झालेली आहे ती संस्था. नाव जरी महिला मंडळ असले तरी तिथे सगळ्यांचाच राबता असायचा. या महिला मंडळापासून मृणालताईंचे गोरेगावातील कार्य सुरु झाले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे.

या महिला मंडळात समाजातील सर्वच स्तरातील स्त्रियांचा सहभाग होता हे एक वैशिष्टय. मुंबईतील आणि बाहेरील प्रत्येक लढ्यात त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या. त्यांचा पाणीप्रश्‍नावरील लढा आणि 'पाणीवाई बाई' म्हणून त्यांची प्रसिद्धी मी भारावून गेले होते. 

त्यावेळी वसंतराव नाईक यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या शक्तिमान मुख्यमंत्र्याला घेराव घालून त्यांनी स्त्रीशक्तीची चुणूक दाखविली होती. त्यांच्या या जिद्दीमुळे त्यांच्याकडे मी आकृष्ट होत गेले होते.

या काळात झालेल्या निवडणुका, प्रचाराचा धुरळा, नांगर खांद्यावर घेतलेल्या शेतकऱ्याचे चिन्ह, प्रचारसभा, मोहन धारिया, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, प्रमिलाताई ही नावे माझ्या आयुष्यात तेव्हाच प्रवेश करती झाली होती. मृणाल ताईंची 'पाणीवाली बाई दिल्ली मे, दिल्लीवाली बाई पानीमें' या घोषणेने अख्खा देश ढवळून निघाला होता.

कालांतराने जनता पक्ष फुटला. आयुष्यभर तत्वालाच सर्वोच्च स्थानी ठेवलेल्यांना या पक्षफुटीचे फारसे काही वाटले नाही. राजकारण हे समाजकारणाचे एक हत्यार म्हणून त्याकडे बघत असल्याने, त्या नाऊमेद झाल्या नाहीत. स्त्रियांच्या विविध प्रश्‍नांवर काम सुरुच ठेवले. त्यांचा हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे व्रत मी घेतले आहे. त्यामुळे हे काम करत राहणारच.

जनता दलात फुट पडली ती लोकसभा निवडणूकांमुळे. प्रा. गोपाळ दुखंडे यांना 2004 लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती पण जनता दलाने त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे ते नाराज होते. याच काळात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून तू स्वतंत्र निवडणूक लढणार का अशी मधू दंडवते यांनी विचारणा केली.

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग माझ्या प्रचारासाठी आले. मधू दंडवतेंच्या सांगण्यावरून मी ती निवडणूक लढविली. काँग्रेस उमेदवार अभिनेता गोविंदाच्या पारड्यात लोकांनी मतदान केले आणि मला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर पक्ष महत्त्वाचा असल्याची जाणीव झाली.

आपण नवा पक्ष काढू असे प्रा. दुखंडे यांचे म्हणणे होते. पण ते शक्‍य न वाटल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आर. आर. पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईच्या लोकलप्रश्‍नावर आंदोलने उभी केली. घरांच्या प्रश्‍नावर, विशेषत: संजय गांधी नॅशनल पार्कवरील वनजमिनींवरील अतिक्रमित घरांसाठी सुरु केलेले आंदोलन आजतागायत सुरु आहे.

2007 मध्ये मी नगरसेविका झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीची अध्यक्ष बनल्यानंतर राजकारण गांभीर्याने घेण्याच निर्णय घेतला. माझ्या प्रभागात जनतेला साध्या सोयीसुविधाही नव्हता. शौचालय, रस्ते, पाणी अशा अनेक समस्या सोडविल्या. प्रशासनाच्या विरोधातला हा लढा यशस्वीरित्या पार केला. 2010 मध्ये पक्षाची महिला अध्यक्ष बनले आणि पवारसाहेबांच्या सांगण्यावरून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला.

पुढे स्त्री भ्रूणहत्येवर आधारित 'सावित्रीच्या लेकी' नावाचा प्राध्यापकांनी तयार केलेल्या चित्रपट आला होता. सामाजिक आशय असलेला या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी 'एनसीपी'ने केवळ माझ्या शब्दाखातर घेतली आणि राज्यभरात प्रदर्शित केला. समाज प्रबोधनासाठी चित्रपटासारख्या माध्यमाचा वापर झाला पाहिजे हा मुद्दा ठासून सांगितल्याने, त्यास सदस्यांनी पाठिंबा दर्शविला होता.

सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम झाले, शेतकरी प्रश्‍न, बचत गटाचे जाळे उभे केले. ताईंच्या 'यशस्विनी'चा झपाटा दिवसेंदिवस वाढत होता.

बचतगटाच्या महिलांना व्यवसायासाठी 'मायक्रो फायनान्स' कर्ज कसे मिळेल याचे मार्गदर्शन मोहम्मद युनिस यांनी थेट बांगलादेशहून येऊन केले होते. बांगलादेशाच्या पद्धतीवर बचतगटांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसेच बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्याबाबत मार्गदर्शन केले.

याचा परिणाम असा झाला की 'बिग बझार' सारख्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये 'यशस्विनीचे स्टॉल्स' उभे राहू लागले. आजही हे काम सुरु आहे. आजही महिलांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आणि स्वाभिमानासाठी मी लढते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com