esakal | योगींच्या वक्तव्यावरून राजकीय धुरळा; कामगारांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप 

बोलून बातमी शोधा

योगींच्या वक्तव्यावरून राजकीय धुरळा; कामगारांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप 

मजुरांचे पालन पोषण राज्य सरकालाने नीट केले नाही.त्यामुळे यापुढे उत्तर प्रदेशातील मजूर हवे असतील तर,आमची परवानगी घ्यावी,’’ या योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय धुरळा उडाला आहे.

योगींच्या वक्तव्यावरून राजकीय धुरळा; कामगारांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप 
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - ‘‘देशात जाहीर केलेल्या लॉकडाउन कालावधीत महाराष्ट्रात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील मजुरांचे पालन पोषण राज्य सरकालाने नीट केले नाही. त्यामुळे यापुढे उत्तर प्रदेशातील मजूर हवे असतील तर, आमची परवानगी घ्यावी,’’ या उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय धुरळा उडाला आहे. त्यांना उत्तर देताना काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापुढे राज्याचा कामगार विभाग परप्रांतीय मजुरांच्या-कामगाराच्या नोंदी ठेवेल, अशी भूमिका घेतली आहे. तर, या वक्तव्याचा समाचार घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात यायचे तर आमची परवानगी घेऊनच यावे, असा टोला हाणला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अदित्यनाथ यांनी यापूर्वीही महाराष्ट्राच्या राजकारणात नाक खुसण्याचे काम केले आहे. लॉकडाउनच्या काळात पालघर येथे साधूंच्या झालेल्या दुर्दैवी हत्याकांडाची काळजी व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून विचारणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत उद्धव यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत फोन करून चिंता व्यक्त करून राजकीय उट्टे काढले होते. यानंतर पुन्हा एकदा अदित्यनाथ आपल्या वक्तव्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उत्तर प्रदेश सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांसाठी नवे धोरण राबवणार असल्याची माहिती तेथील पत्रकारांना दिली. त्यामधे मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश केला जाणार आहे. जर कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची आवश्यकता भासत असेल तर, त्या राज्याने अगोदर या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन दिले पाहिजे. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीशिवाय त्या राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही, असे ते म्हणाले होते. 

ही माहिती देतानाच अदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशातील मजुरांचे पालनपोषण व्यवस्थित केले नाही. त्यांचे हाल केले, अशी टीका केली होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

योगी यांच्या वक्तव्याचा धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदित्यनाथ यांना चांगलेच सुनावले. राज यांनी खास शैलीत समाचार घेताना म्हटले आहे की, 

योगी अदित्यनाथ म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे सुद्धा आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावे. 

राज यांची टीका 
योगी यांनी दिलेल्या इशाऱ्याचा संदर्भ घेत राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. ते आपल्या फेसबुक पोष्टमध्ये म्हणतात की, महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यापुढे कामगार राज्यामध्ये अल्यावर त्यांची नोंद करावी आणि पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो, त्यांची ओळखपत्रे असली पाहिजेत. 
राज म्हणाले की, ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर, त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्याने आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही. याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्राने आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी. 

आदित्यनाथांची भूमिका चुकीची 
योगी आदित्यनाथ यांच्या आरोपालाही काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सडतोड उत्तर दिले. ‘‘योगी आदिनाथ यांची भूमिका चुकीची असून सावत्र आई म्हणणे बरोबर नाही. आईने काळजी घेतली नाही म्हणून मावशीने काळजी घेतली. महाराष्ट्रात म्हण आहे,  माय मरो पण मावशी जगो. लॉकडाउनच्या काळात या मजुरांची दोन महिने महाराष्ट्र सरकार तसेच विविध स्वयंसेवी,  सामाजिक संस्थांनी काळजी घेतली.  त्यांना दोनवेळचे जेवण,  औषधे मिळतील याची व्यवस्था केली. घरच्या माणसांप्रमाणे त्यांची व्यवस्था केली तसेच जातानाही त्यांना सन्मानाने पाठवले आहे. असे असताना योगी आदित्यनाथ यांनी केलेले आरोप दुर्दैवी व निराधार आहेत. हे मजूर परत आल्यावर पण मावशीच काळजी घेणार आहे, ते मावशीकडे परत येणार आहेत. मजुरांना घराची ओढ लागली होती.  कुटुंबाने त्यांना बोलवले होते त्यामुळे ते गावी गेले पण कुटुंब काय असत?  हे योगी आदित्यनाथ यांना कळणार नाही,’’  असा टोलाही थोरात यांनी लगावला. 

कोरोनाच्या संकटात बऱ्याच गोष्टी बदलणार असून परराज्यातील असले तरी हे कामगार या राष्ट्राचे नागरिक आहेत हे विसरून चालणार नाही. जेव्हा ते परत येतील त्यावेळी नियोजन करावे लागेल,  त्यांच्या नोंदी ठेवण्याबाबत राज्य सरकारचा कामगार विभाग नक्की विचार करेल. 
- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री