पुणे, सोलापुरातून आणखी शस्त्रे जप्त; सुधन्वाच्या चौकशीतून माहिती 

police
police

मुंबई : नालासोपारा येथून स्फोटकांचा मोठा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी (ता. 11) पुणे आणि सोलापूर येथूनही 10 गावठी पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त केला. सुधन्वा सुधीर गोंधळेकर याने हा साठा लपवला होता. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने हा साठा जप्त केला. 

एटीएसने शुक्रवारी वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली. गोंधळेकर याच्या चौकशीनंतर 10 गावठी कट्टे, एक एअर गन, 10 पिस्टल बॅरल, अर्धवट बनवलेली सहा पिस्टल बॉडी, सहा पिस्टल मॅगेझिन, अर्धवट तयार झालेली तीन मॅगेझिन आणि सात पिस्टल स्लाइड, 16 रिले स्वीच, वाहनांच्या सहा पाट्या, एक ट्रिगर मेकॅनिझम, एक चॉपर आणि स्टीलचा चाकू आदींसह अर्धवट तयार शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हॅंडग्लोज, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटकांबाबतचे हॅंडबुक, मोबाईल प्रिंटआउट, रिले स्वीच सर्किट पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड आदी साहित्यही जप्त करण्यात आले. 

याप्रकरणी तपासासाठी राज्यभरात 10हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोधमोहिमेसह अनेकांची चौकशीही करण्यात आली. 

तिघे रडारवर 
वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या अटकेनंतर आणखी तिघे संशयित एटीएसच्या रडारवर आहेत. अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी नाहीत. मुख्य सूत्रधार वेगळाच आहे. त्याच्यासह शस्त्रे पुरवणारे इतर दोघे एटीएसच्या रडारवर आहेत. 

असा लागला छडा... 
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर अनेक कडव्या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांवर एटीएसने नजर ठेवली होती. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एटीएसने नालासोपारा येथून 20 गावठी बॉंब जप्त केले. राज्यात काही जण घातपाताच्या प्रयत्नात असल्याची माहिती एटीएसला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार 15 ते 20 मोबाईल क्रमांक रडारवर होते. त्यांच्या तपासणीत पाच मोबाईल क्रमांक अंतिम करण्यात आले होते. या क्रमांकांचा माग काढत एटीएसचे अधिकारी वैभव राऊतपर्यंत पोचले. त्याच्या चौकशीत शरद आणि सुधन्वा यांची नावे पुढे आली. एटीएसने गुरुवारी वैभवच्या घरी आणि दुकानात छापा घातला. त्या वेळी घरातून आठ आणि दुकानातून 12 गावठी बॉंब जप्त करण्यात आले. आणखी 50 बॉंब ही टोळी बनवणार होती. बॉंब कसे बनवावे याचे रेखाचित्र आणि काही कागदपत्रे शरदच्या घरात सापडली. 

बाँब दहशतीसाठीच? 
मागील आठवड्यापासूनच या तिघांनी बॉंब बनवण्यास सुरवात केली होती. हे बॉंब जास्त क्षमतेचे वाटत नाहीत. याबाबतचा अधिकृत न्यायवैद्यक अहवाल अद्याप प्रलंबित आहे. हे संशयित नवोदित असून यामागे नक्कीच मुख्य सूत्रधार असावा, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. गौरी लंकेश, पानसरे आणि दाभोलकर हत्या प्रकरणांच्या अनुषंगानेच सर्व संशयितांची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

राज्यभरात अनेकांची चौकशी 
पोलिसांनी इतर सुमारे 16 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातील अनेकांचे जबाब घेऊन सोडण्यात आले; मात्र पाच संशयितांची सखोल चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

'ती' स्फोटके आंदोलनात घातपातासाठी होती: जितेंद्र आव्हाड
"सनातन'चा साधक वैभव राऊत आणि त्याच्या दोन साथीदारांकडून एटीएसने जप्त केलेले आठ क्रूड बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याची सामग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता, असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे तीव्र आंदोलन सुरू आहे. नालासोपाऱ्यात राऊतच्या घरी गावठी बॉम्ब आणि स्फोटके सापडली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com