‘वंचित’ने काँग्रेससोबत यावे - विजय वडेट्टीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

‘देशाचे संविधान वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे, ही पक्षाची इच्छा आहे. परंतु, प्रकाश आंबेडकरांची सध्या जी भाषा आहे. त्यावरून ते आमच्यासोबत येतील, असे वाटत नाही. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे मी म्हणणार नाही. कारण तसा पुरावा नाही.

नागपूर - ‘देशाचे संविधान वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे, ही पक्षाची इच्छा आहे. परंतु, प्रकाश आंबेडकरांची सध्या जी भाषा आहे. त्यावरून ते आमच्यासोबत येतील, असे वाटत नाही. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे मी म्हणणार नाही. कारण तसा पुरावा नाही.

पण, सी, डी, ई, एफ... असे काहीतरी नक्कीच आहे. विधानसभेतही ते लोकसभेप्रमाणे भाजपचाच फायदा करणार, असे दिसतेय. एकंदरीतच काय तर ‘वंचित’चं कदाचित ठरलंय,’’ असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज म्हणाले. 

पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर वडेट्टीवार आज प्रथमच विदर्भात आले आणि पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ६.७ टक्के मते मिळाली आणि आम्हाला १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते आहेत. या टक्केवारीचा विचार करूनच त्यांनी अपेक्षा ठेवली पाहिजे. पण, त्यांनी ‘आम्ही काँग्रेसला ४० जागा देतो, त्यांनी विचार करावा,’ असे नुकतेच म्हटले. त्यामुळे त्यांची मनापासून आघाडीत येण्याची इच्छा आहे, असे वाटत नाही. गेल्या साडेचार वर्षांतील अधिवेशनाप्रमाणे हेही एक अधिवेशन होते. एकही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ३०-३५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. दर वर्षी नाल्या स्वच्छतेसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले जातात. तरीही दर वर्षी मुंबई पाण्यात बुडते. याला काय म्हणावे. पहिल्याच पावसात मुंबईत ३६, भिवंडीत १५, रत्नागिरी जिल्ह्यात धरण फुटून २८ जणांचे जीव गेले. हे सर्व सरकारच्या दुर्लक्षाचे बळी आहेत. निवडणुकीच्या यशाच्या धुंदीतून सरकार अद्याप बाहेर पडले नसल्याचा टोला हाणत या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi Congress Compromise vijay vadettivar Politics