वंचितसाठी काँग्रेस कासावीस; राहुल गांधींनी घातले लक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 जून 2019

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या दणक्‍यानंतर आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्रीसाठी कॉंग्रेस कासावीस झाला आहे. दिल्लीत आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष राहुल गांधींनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना "वंचित'ला सोबत घेण्यासाठी बोलणी करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानसभेसाठी चर्चा करण्याचा राहुल गांधी यांचा आदेश 
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या दणक्‍यानंतर आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्रीसाठी कॉंग्रेस कासावीस झाला आहे. दिल्लीत आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष राहुल गांधींनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना "वंचित'ला सोबत घेण्यासाठी बोलणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरियानातील कॉंग्रेस नेत्यांशी चर्चेनंतर राहुल गांधींनी आज महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांशी संवाद साधला. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, हुसेन दलवाई आदी 30 नेते उपस्थित होते. 

वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत जवळपास डझनभर जागा गमवाव्या लागल्या होत्या, त्यामुळे किमान विधानसभा निवडणुकीत तरी या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न करण्याचे राहुल गांधींचे म्हणणे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना एकजुटीने काम करण्यास सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी मैत्री आहेच. जागावाटपावर लवकरात लवकर निर्णय करा. तसेच, वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करा, असे राहुल यांनी या नेत्यांना सांगितल्याचे कळते. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस दुर्बल ठरल्याचा मुद्दा पक्षनेत्यांनी राहुल यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले, हा युक्तिवाद राहुल यांनी अमान्य केला. 

लवकरच नवा अध्यक्ष मिळणार 
चांगले काम करून यश दिले असते, तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती, अशी भूमिका राहुल यांनी मांडल्याचे कळते. राहुल यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून पक्षात गोंधळ सुरूच आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आजच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या बैठकीत वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधींना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, "काही दिवसांतच कॉंग्रेसला नवे अध्यक्ष मिळतील, त्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत होतील. मी तुमच्यासोबत आहेच,' अशा शब्दांत राहुल यांनी राजीनाम्याच्या निर्णयात बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. राहुल यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे या मागणीसाठी दुसऱ्या फळीतील नेत्यांनी राजीनामा सत्र सुरू केल्यानंतर वरिष्ठ नेत्यांवरही दबाव वाढला आहे. 120 नेत्यांच्या या राजीनामा नाट्यानंतर किसान कॉंग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनीही आज राजीनामा दिला.

अशोक चव्हाणविरोधी गट पुन्हा एकदा सक्रिय 
महाराष्ट्रात निवडणुकीत लक्षणीय कामगिरी नोंदवायची असेल, तर अशोक चव्हाण यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ठेवू नये, अशी मागणी असंतुष्ट गटाने पुन्हा एकदा लावून धरली आहे. महाराष्ट्राविषयी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी नेते रवाना झाले असतानाच पुन्हा एकदा या मागणीने जोर धरला आहे. 

कॉंग्रेसच्या कृषी विभागाच्या प्रमुखपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिला. पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच चव्हाण यांनी दिलेला राजीनामा स्वीकातून पुढच्या हालचाली सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी काही नेत्यांनी केली आहे. या नेत्यांवर अशोक चव्हाणांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत अन्याय केला. त्यामुळे ते सक्रिय झाले, असे बोलले जाते. नांदेड लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले अशोक चव्हाण राज्याचे नेतृत्व कसे करतील, असा प्रश्‍न हे बंडखोर नेते करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi Rahul Gandhi Congress Politics