साडेसहा तासांत ४५५ किमी अंतर पार करणारी ‘वंदे भारत’! पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'वंदे भारत' ट्रेन
साडेसहा तासांत ४५५ किमी अंतर पार करणारी ‘वंदे भारत’! पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय

साडेसहा तासांत ४५५ किमी अंतर पार करणारी ‘वंदे भारत’! पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ‘वंदे भारत’च्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या एक्सप्रेसमुळे शिर्डी, नाशिक, पंढरपूर, तुळजापूर व अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. तसेच नोकरदार व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील सोय होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंत भारतातील १०८ जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विविध शाळांमधील सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांनी ‘वंदे भारत’ या थीमवर चित्रकला, लेखन आणि भाषण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्या स्पर्धांमधील विजेत्यांनी पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून त्या एक्सप्रेसने मोफत प्रवास केला. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ ट्रेन ही देशातील नववी ट्रेन आहे. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवणारी आहेल. व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक दर्जाच्या नवीन ट्रेनने महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडले गेले. त्यामुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी ही तीर्थक्षेत्रेही जलदगतीने जोडली जाणार आहे.

साडेसहा तासांत ४५५ किमी अंतर पार

वंदे भारत एक्स्प्रेस ही सोलापूरहून गुरुवार वगळता दररोज सकाळी ६.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता मुंबईला पोहचेल. परतीच्या प्रवासात वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बुधवार वगळता दररोज सायंकाळी ४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहोचेल. दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे त्या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस साडेसहा तासांत ४५५ किमी अंतर पार करेल. सध्याच्या सुपरफास्ट ट्रेनला तेवढे अंतर कापायला सात तास ५५ मिनिटे लागतात. ‘वंदे भारत’मुळे प्रवासाचा दीड तासांचा वेळ कमी होणार आहे. ही गाडी एकाच दिवशी भोर घाटावर चढेल आणि उतरेल, म्हणजे लोणावळा-खंडाळा घाट विभागात, ज्याचा सर्वात उंच उतार ३७ मीटरवर एक मीटर आहे.