
सीएसएमटी- सोलापूर आणि सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला महिन्याभरात प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची पसंती! एक लाख प्रवाशांनी केला प्रवास
मुंबई - सीएसएमटी- सोलापूर आणि सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला महिन्याभरात प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात दोन्ही वंदे भारत ट्रेनमधून तब्बल एक लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ८. ६० कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेला मिळाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

सीएसएमटी- शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. मात्र, वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला सुरुवातीला प्रवाशांचा सुट्टीचा दिवशी तुफान प्रतिसाद मिळात होता. परंतु आता प्रवाशांमध्ये वंदे भारत ट्रेन लोकप्रिय होत आहे. अवघ्या ३२ दिवसांच्या कालावधीत एक लाख २५९ प्रवाशांची वाहतूक केली आहे. त्यातून मध्य रेल्वेने ८.६० कोटींची महसूल गोळा केला आहे.

ट्रेन क्रमांक २२२२५ मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने सीएसएमटी, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील २६,०२८ प्रवासी संख्येतून २.०७ कोटी महसूलाची नोंद केली. ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७ हजार ५२० प्रवासी संख्येतून २.२३ कोटीं रुपयांचा महसूल नोंदविला. ट्रेन क्रमांक २२२२३ - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील २३ हजार २९६ प्रवाशांच्या संख्येतून २.०५ कोटी रुपयांची महसूलाची नोंद केली. ट्रेन क्रमांक २२२२४ साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून २३ हजार ४१५ प्रवाशांच्या संख्येतून २.२५ कोटी महसूलाची नोंद केली.
या आहे सुविधा -
वंदे भारत ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर पट्ट्या यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत.
देशभरात १० वंदे भारत ट्रेन -
१५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन रुळावर आली. अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ४ वर्षे पूर्ण झाली. आलिशान आणि उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह देशभरात आतापर्यंत १० वंदे भारत ट्रेन रुळांवर धावत असून या ट्रेन्सची निर्मिती देखील जलदगतीने सुरु आहे. या ट्रेनमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात कमालीची क्रांती घडली आहे. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेननंतर सद्यस्थितीत १० ट्रेनद्वारे १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत ट्रेनशी जोडले गेले आहेत.