दादरमधील उद्यानात अनुभवा विविध वाद्यांचा ध्वनितरंग

दादरमधील उद्यानात अनुभवा विविध वाद्यांचा ध्वनितरंग

वडाळा : तबला, डग्गा, सतार, सरोद, हार्मोनियम, सारंगी आदी वाद्ये आपण दुकानात, संगीत विद्यालय वा कार्यक्रमात पाहिली आहेत. संगीतातील त्यांचा श्रवणीय मिलाफ आपण अनेकदा ऐकलेला आहे; परंतु नगरसेवक सुधीर जाधव यांच्या संकल्पनेतून प्रथमच एका उद्यानात वाद्यांचा सुरेल आवाज अनुभवता येणार आहे. दादर पश्‍चिमेतील संगीतकार वसंत प्रभू उद्यानात आठ प्रकारची संगीत वाद्ये लावण्यात आली असून, बटन दाबले की त्यातून ध्वनितरंग उमटत असल्याने नागरिकांचे ते आकर्षण ठरत आहे.
 

मुंबईतील उद्यानात आजवर केवळ मुले खेळताना अथवा शतपावलीसाठी आलेल्या नागरिकांना आपण पाहिले आहे; मात्र आता उद्यानात येणाऱ्या नागरिकांना संगीताचे श्रवणीय सूरही ऐकायला मिळणार आहेत. नगरसेवक सुधीर जाधव यांनी दादर पश्‍चिमेत तीन "थीम पार्क‘ उभारली आहेत. जशी वाद्ये तशा प्रकारचा ध्वनी अशी संकल्पना तयार करण्यात आली आहे. चित्रकार दीनानाथ दलाल उद्यानात दलाल यांची चित्रे पाहायला मिळतील. नाटककार केशवराव दाते बालोद्यान व महिला व्यायामशाळेसोबतच तीन उद्यानांची मनोरंजनात्मक पुनर्बांधणी करण्यात आली असून, त्याचे उद्‌घाटन नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी रिटा गुप्ता, कला दिग्दर्शक सुरेश तारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

आकाराची तुलना जरी शक्‍य नसली तरी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कसारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न "थीम पार्क‘च्या माध्यमातून करण्यात आला असून, विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड देण्याचा हेतू असल्याचे जाधव यांनी सांगितले.

गाणी-सुरांच्या सोबतीने अभ्यासही
संगीतकार वसंत प्रभू, चित्रकार दीनानाथ दलाल आणि नाटककार केशवराव दाते यांच्या नावाने असलेल्या उद्यानात नागरिकांना दीनानाथ दलाल यांची चित्रे पाहता येतील. इथे चित्रकलेचे वर्ग घेण्यासाठीही जागा उपलब्ध आहे. सकाळ-संध्याकाळ फिरताना वसंत प्रभूंची गाणी ऐकू येतील. तबला, डग्गा, सतार, सरोद, हार्मोनियम आणि सारंगी अशी आठ प्रकारची भारतीय वाद्ये उद्यानात आहेत. ज्यांना हात लावताच त्यातून श्रवणीय सूर उमटतील. विद्यार्थ्यांकरता अभ्यासिका आहे. लाल मातीचे मैदान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com