नर्मदा परिक्रमा

वसुंधरा काशीकर-भागवत
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

स्वत:जवळ असलेल्या या खजिन्याची त्यांना अर्थातच जाणीव होती. म्हणूनच केवळ शब्दांनी मी कोणालाही फुलवू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता अन् तो सार्थच होता. तेव्हा असा श्रीमंत श्रोता संवादासाठी कायमस्वरूपी मिळावा ही त्यांची आस, तहान स्वाभाविकच होती.

जनसंसद झाल्यानंतर 2003ची गोष्ट असावी. शरद जोशींनी नर्मदा परिक्रमा करायचं ठरवलं होतं.

‘नर्मदे हर’ हे नर्मदा परिक्रमेवरील जगन्नाथ कुंटेंचं पुस्तकही त्यांनी वाचलं होतं. दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तकही त्यांनी वाचलं होतं. त्याआधी त्यांना हार्टअटॅक येऊन गेले होते. पॅरालिलिसचा झटका पण येऊन गेला होता. बायपास सर्जरी झाली होती. डायबेटीस होताच. शरीर तसं जर्जर, दुबळं झालं होतं. पुढे संघटनेचं काम करायचं, पुढे न्यायचं, वाढवायचं तर शरीर चांगलं असणं खूप गरजेचं होतं. नर्मदा परिक्रमा करण्यापूर्वीसुद्धा ते पायी फिरणे, जेवणाच्या संदर्भातील पथ्य काटेकोरपणे पाळणे हे सर्व ते करतच होते. आता त्यांचा एकच ध्यास होता तो म्हणजे आरोग्य वृद्धी. नर्मदा परिक्रमा करण्यापूर्वी आम्ही फोनवर बोलत असताना मी त्यांना विचारलं की, तुम्ही नर्मदा परिक्रमा का करत आहात ? त्यावर त्यांनी विस्ताराने उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, ‘’माझं शरीर या आजाराने जड, जर्जर आणि एखाद्या लाकडी ठोकळ्यासारखं झालं आहे. ते माझ्यासाठी आज ओझ झालं आहे, ते तसं होता कामा नये. संघटना पुढे न्यायची असेल तर तब्येतीवर काम करावंच लागेल. याहीपलीकडे जीवन-मृत्यूचं रहस्य समजून घेतल्याखेरीज मी मरणार नाही.

खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार जिंकणार आहेच, पण मी तो सर्वात प्रथम आणल्याने माझ्यासमोर ते स्वप्नं पुरं व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी नर्मदा परिक्रमा करून मी नवं शरीर, नवी ताकद घेऊन परत येणार आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे माझ्यासाठी एक आशेचा किरण आहे. इतकं सलग चालणं झाल्यावर शरीराचं पुनरूज्जीवन होईल अशी मला आशा वाटते. त्यानंतर जर प्रकृती सुधारली आणि मी पुढचे २०, २२ वर्ष चांगल्या तह्रेने जगीन अशी खात्री वाटली तर मी विवाहाचा विचार करीन. हा एकटेपणा आता सहन होण्यापलीकडे आहे. मला खरंच कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे’’.

‘’दुसरं असं की, नर्मदा परिक्रमा पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्प्यात माणसाला काही आत्मसाक्षात्कार होऊ शकतो असं म्हणतात. मला जन्म मृत्यूचं रहस्य शोधायचं आहे. ते शोधल्याशिवाय मला मरायचं नाही. यात ते सापडू शकतं किंवा नाही सापडलं तरी, प्रकृती सुधारल्याने ते शोधता येईल’’.

प्रकृती सुधारेल, शरीर चांगलं काम करू लागेल अशी जबरदस्त आशा त्यांना होती. मला यावर ऐतरेय उपनिषदातील अप्सरांचा एक संवाद आठवला. हे शरीर जन्माला आलं तेव्हा अप्सरा म्हणतात, ‘’अहाहा! काय सुंदर शरीर आहे, कारण यात त्याला जाणून घेण्याची व्यवस्था आहे’’. त्यामुळे मुक्ती मिळवायची असेल, परमार्थ करायचा असेल तरी शरीर सुदृढच हवे. त्यासाठी त्यांना नर्मदा परीक्रमा करायची होती.

माझे सख्खे मोठे काका सतीश काशीकर, जे आता हयात नाहीत, त्यांना नर्मदा परीक्रमा करायची होती. नर्मदा परिक्रमेवर बोलत असताना ते एकदा सांगत होते की, नर्मदा परिक्रमेचे काही नियम आहेत. ती अनवाणी पायांनी करावी लागते. सोबत पैसे घेता येत नाही. अगदी जुजबी कपडे घ्यायचे. सबंध परिक्रमेत नर्मदा आपली परीक्षा बघत असते. परिक्रमेमध्ये एक ठिकाण, एक जागा अशी येते की, तिथे भिल्ल लोक तुम्हाला येऊन पूर्ण लुटतात. अक्षरश: कपडे सुद्धा काढून नेतात. ही सगळी तुमच्या धाडसाची, निग्रहाची आणि विश्वासाची परीक्षा असते. ‘ज्याने दिल्यात चोची देईल तोच चारा, हा ठेवूनी भरवसा केला प्रवास सारा’...हा विचार या परिक्रमेचा पाया आहे. आणि परिक्रमा पूर्ण होता क्षणीच नर्मदा तुमच्यासमोर प्रत्यक्ष उभी ठाकते अन् तुम्हाला तुमची इच्छा विचारते. त्या क्षणी जे मागू ते नर्मदा देते अशी श्रद्धा आहे. पण त्यातला विरोधाभास हा आहे की, संपूर्ण परिक्रमा झाल्यावर तुम्हाला कोणती इच्छाच राहत नाही. तुमच्या सगळ्या वासना विलय पावतात.

मी शरद जोशींना विचारलं, आपण कल्पना करू, ‘समजा अशी नर्मदा तुमच्या समोर उभी राहिली अन् तुम्हाला विचारलं की तुला काय पाहिजे तर तुम्ही काय मागाल’ ? जोशींनी एका क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं...मी कम्युनिकेशन साठी माणूस मागेन….

या उत्तरानंतर किती तरी वेळ फोनवर दोन्ही बाजूने शांतता होती. काही वेळाने ‘बरं, ठेवते मग’ एवढचं बोलण्याचं धैर्य मी एकवटू शकले.

या उत्तरावरून त्यांना किती भीषण एकटेपणा होता याची कल्पना येऊ शकते. अनेक वर्षांच्या एकटेपणातून त्यांच्या आयुष्यात एक पोकळी तयार झाली होती. ते जे बोलतात, ज्या कल्पना मांडतात, ते समजणारं, त्या विषयी परत आपलं मत नोंदवणारं..त्यांच्यातही कदाचित काही नव्या गोष्टींची भर घालू शकेल...अशा समृद्ध, श्रीमंत संवादासाठी ते भुकेले होते. प्रत्येकच बुद्धिमान आणि संवेदनशील माणसाची संवादाची भूक फार मोठी असते. जोशी त्याला अपवाद कसे असणार? अनेकदा ते बोलत असताना त्यांच्या बोलण्यातील संदर्भ सुद्धा कळणे लोकांना कठिण जायचे. कारण संस्कृतातले, इंग्रजी वाड्मयातले, अर्थशास्त्रातले अनेक संदर्भ त्यांच्या बोलण्यात येत असत. वाचन अफाट असल्याने पुस्तकांमधले विचारवंताची उद्घृतं, उदाहरणं यांची उधळण त्यांच्या बोलण्यात असे. त्याला दाद देणारं, त्यातलं सौंदर्य पिऊ शकणारा असा श्रोता त्यांना हवा होता. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, ‘वक्ता वक्ताची नोहे श्रोतिया विण’...चांगला श्रोता ही वक्त्याची आणि वक्तृत्वाची गरज पहिली गरज आहे. समज असणा-या माणसासमोर बोलत असताना, विचार मांडत असताना किंवा कुठली नवी कल्पना मांडत असताना त्यांचा चेहरा आनंदाने उजळू लागे. डोळे विलक्षण आनंदाने चमकत. एखादा शास्त्रीय संगीताचा कसलेला गायक जसा दीर्घ आलाप घेऊन सुंदर सम पकडतो अन् त्यानंतर जी काही श्रोत्यांची दाद त्याला अपेक्षित असते तसंच त्यांचं होई… मुख्य विचार सूत्र मांडताना त्याच्या समर्थनार्थ किंवा त्याची सिद्धता करण्यासाठी ते अनेक तर्कशुद्ध उदाहरणं जोडीला देत. अशी विचाराची संथ आलापी करत करत ते शेवटी प्रमेयाच्या सिद्धतेवर जेव्हा येत तेव्हांचा क्षण म्हणजे, अहाहा...सुभान अल्लाह! क्या बात है..!

आणि एखादा गणितज्ज्ञ ज्याप्रमाणे आपल्या प्रमेयाची सिद्धता झाल्यावर अतीव समाधानाने शांत होत असतानाच विलक्षण उर्जेने भरून निघेल तसेच शरद जोशींचे होई. संपूर्ण विचार मांडून झाल्यावर ते प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघत असत...बोलताना त्यांच्या नजरेत वेध घेण्याचा भाव असे. अतिशय विचारपूर्वक हळूहळू एकेक विचार ते मांडत. त्यांची वाक्यरचना, त्याचे व्याकरण, शब्दांची अत्यंत विचारपूर्वक केलेली निवड, त्यांची योजना व क्रम सारं कसं शिस्तबद्ध, रेखीव आणि देखणं...शरद जोशींचे बोलणं ऐकताना एकाच वेळी उत्तम काव्य, ताकदीचे गायन, शुद्ध गणित, अनंत वेळा प्रयोग करून हातात आलेलं कठोर शास्त्र, आणि सोबतच एखाद्या प्रतिभावंत चित्रकाराने रंगाचे सहज फटकारे मारून काढलेलं चित्र...असं सारं एकाच ठिकाणी अनुभवास येई.

स्वत:जवळ असलेल्या या खजिन्याची त्यांना अर्थातच जाणीव होती. म्हणूनच केवळ शब्दांनी मी कोणालाही फुलवू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता अन् तो सार्थच होता. तेव्हा असा श्रीमंत श्रोता संवादासाठी कायमस्वरूपी मिळावा ही त्यांची आस, तहान स्वाभाविकच होती.

त्यांनी अशी मोठी आशा घेऊन नर्मदा परीक्रमा सुरू केली खरी. पण ती खऱ्या अर्थाने परिक्रमा होती असं मला वाटत नाही. कारण एकतर खूप कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन ते गेले होते. त्यांचा मोबाईल त्यांच्या सोबतच होता. त्यामुळे ती परीक्रमा त्यांच्या आतल्या प्रवासाला मदत करणार नव्हतीच. आपल्याला बाहेरचा प्रवास अधिक आनंद उपभोगत करता यावा हाच त्यामागील उद्देश स्पष्ट दिसत होता. पण दुर्दैवाने तो ही सफल होऊ शकला नाही कारण परीक्रमा पूर्ण होण्याच्या काही किलोमीटर अगोदर त्यांना पुन्हा स्ट्रोक आला आणि परीक्रमा सोडावी लागली. त्याचं अपरिमित दु:ख त्यांना झालं. नंतर पुन्हा बरे झाल्यावर त्यांनी राहीलेली परिक्रमा पूर्ण केली, पण सलग परिक्रमा ते करू शकले नाही पण कितीतरी गोष्टी माणसाच्या हाताबाहेर असतातच असतात. आणि हे घटना, गोष्टींचे हाताबाहेर असणेच त्याला जमिनीवर ठेवते. शरीर सुदृढ करण्याचा हा एक प्रयत्न तरी फसला होता. परीक्रमा पूर्ण झाल्यावर जर २०-२२ वर्ष जगण्याची खात्री वाटली तर पुन्हा विवाह करू शकतो ही मुळातच धूसर असलेली इंद्रधनुष्यी शक्यता फारच लवकर पूर्ण विरून गेली...ते  नक्की तेव्हा हेच म्हणत असतील…

सहरा(वाळवंट) की तिश्नगी (तहान) का बहुत जिक्र हो चुका

प्यासे समुंदरों की भी, तो कोई बात किजिये…

(नुकतेच प्रकाशित झालेल्या शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! या पुस्तकातील काही भाग आहे.)

Web Title: Vasundhara Kashikar write book on Sharad Joshi