
दिल्लीच्या इशाऱ्यावर चालते सरकार; अंबादास दानवे
औरंगाबाद : फॉक्सकॉन-वेदांत सारखा मोठ्या गुंतवणुकीचा, रोजगारनिर्मिती करणारा उद्योग गुजरातने पळविला आहे. त्यामुळे दिल्लीतील केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे राज्य सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला. फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आग्रही होते. त्यात गुजरात कुठेच नव्हते. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी अनेक सवलती देऊ केल्या होत्या. तळेगाव येथे जागाही निश्चित केली. तरीही प्रकल्प गुजरातला जाणे चुकीचे असल्याचे मत दानवेंनी व्यक्त केले.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, लम्पीमुळे जनावरांवर संकट आदींत सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. कायदा-सुव्यस्थेचे धिंडवडे निघत आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. आमदार नितेश राणे, प्रकाश सुर्वे, संतोष बांगर, संजय गायकवाड, सदा सरवणकर, रवी राणा आदी कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत. पालघरमध्ये साधूंवर हल्ले झाले तेव्हा भाजपने आकाश पाताळ एक केले होते. तेव्हा हिंदू सुरक्षित नसल्याचे ते सांगत होते. आता सांगलीमध्ये साधूवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचे काय, असा सवाल दानवेंनी केला.
ध्वजवंदन सोहळ्याचे वेळापत्रक बदलले
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी औरंगाबादेत होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्याचे वेळापत्रक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलले. हैदराबादला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला वेळेवर पोचता यावे, यासाठी शिंदे यांनी हा प्रकार केल्याचा आरोप दानवे यांनी केला.
भुमरेंच्या जावयाला कंत्राट
ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचे कंत्राट रोजगारहमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या जावयाकडे असल्याचा आरोप दानवेंनी केला. एक कंत्राटदार असताना दुसऱ्या कंत्राटदाराने त्याच्याकडून रजिस्ट्री करून घेणे योग्य नाही. अशी सरकारी प्रक्रिया करून घेणे गंभीर बाब आहे. ही योजना जनतेच्या हितासाठी आहे की भुमरे यांच्या जावयाच्या गुत्तेदारीसाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.