वीरपत्नी शोधतेय अंधारातून प्रकाशाची वाट

सुस्मिता वडतिले 
सोमवार, 1 जुलै 2019

सोलापूर जिल्ह्यातील १०० हून अधिक वीरपत्नींनी पाच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी शेतजमीन मागितली. मात्र, आतापर्यंत त्यातील फक्‍त पाच वीरपत्नींनाच जमीन मिळाली असून, उर्वरित वीरपत्नींना अद्याप शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर -  पती हुतात्मा झाल्यानंतर संसारातील अंधार दूर करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील १०० हून अधिक वीरपत्नींनी पाच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी शेतजमीन मागितली. मात्र, आतापर्यंत त्यातील फक्‍त पाच वीरपत्नींनाच जमीन मिळाली असून, उर्वरित वीरपत्नींना अद्याप शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र आहे.

बार्शीतील संतोष शिंदे हा जवान २००९ मध्ये सिक्‍कीम येथे साहित्य पुरवठा करायला गेल्यानंतर तेथून खाली पडून हुतात्मा झाला. त्या वेळी त्यांचा पहिला मुलगा तिसरीत, तर दुसरा मुलगा सात महिन्यांचाच होता. त्याला आपल्या वडिलांची ओळख होण्यापूर्वीच ते हुतात्मा झाले. त्या वेळी संतोष यांच्या पत्नी सुनीता यांचे वय होते २६ वर्षे. अधिकाऱ्यांनी दिलेला दिलासा आणि शासनाच्या सवलतींचा फायदा मिळेल, या आशेने संसार पुन्हा थाटण्याचा निर्धार केला. मुलांचा सांभाळ करताना उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला. त्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयात शेतजमीन मागितली; परंतु युद्धात हुतात्मा झालेल्या वीरपत्नींनाच त्या योजनेचा लाभ मिळतो, असे त्यांनी सांगितले. तत्कालीन, सरकारकडून त्यांना सांत्वन करणारे पत्र यायचे; पण त्यानंतर या सरकारने काहीच केले नसल्याची खंत वीरपत्नींनी बोलून दाखवली.

आयुष्याची वाट खडतरच
देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या हुतात्मा सैनिकांमध्ये भेद केला जाऊ नये. मात्र, युद्धात हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबांना पाच एकर शेतजमीन अन्‌ अन्य ठिकाणी हुतात्मा झालेल्यांना काहीच नाही, असे सरकारचे धोरण आहे. दहावी, बारावीतील हुतात्मा जवानांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, त्यातही निकषांची आडकाठी आहेच.

शासकीय योजनांचा लाभ मिळावा अन्‌ संसाराला हातभार लागेल या उद्देशाने अनेकवेळा सैनिक कल्याण कार्यालयात गेले. मात्र, कोणीच त्या ठिकाणी व्यवस्थीत बोलत नाही, साहेब नसल्याचे सांगून नंतर या, असे उत्तर मिळते. शेतजमीन, मुलाला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मागील पाच वर्षांपासून माझी वणवण सुरू आहे.
- सुनीता शिंदे, वीरपत्नी, बार्शी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veerapatni demanded farm land for livelihood