भाज्या महागल्या; गृहिणींचे बजेट कोलमडले

Vegetables are expensive in pimpri
Vegetables are expensive in pimpri

पिंपरी - यंदा झालेल्या अतिपावसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. परिणामी, गृहिणींचे बजेट कोलमडले; तसेच खानावळीचा व्यवसाय करणाऱ्यांना या महागाईचा फटका बसू लागला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे अनेक ठिकाणी भाज्यांच्या उत्पादन घट झाल्याने भावात वाढ झाली आहे. भावातील वाढीत सातत्य असून, आगामी पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहणार असल्याचे पिंपरी मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितले. पालेभाज्यांसह काकडीच्या भावात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये किलो या भावाने मिळणाऱ्या टोमॅटोसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. मटारच्या भावाने तर शंभरी ओलांडली आहे.  

आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांमधून कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. ज्यांच्या नोकऱ्या टिकून आहेत अशापैकी अनेकांना पगारवाढ एकतर मिळालेली नाही अथवा अत्यल्प मिळालेली आहे. त्यामुळे आहे त्याच उत्पन्नात जगणेही सामान्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. घरखर्च भागविणाऱ्या गृहिणींना वाढत्या महागाईच्या काळात कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्‍न पडला आहे. घर चालविण्यासाठी प्रत्येक बाबींच्या खर्चाचे बजेट ठरलेले असते. त्यापेक्षा जास्त खर्च करणे त्यांना शक्‍य नसते. त्यामुळे रोज भाजी आणणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अशा महिला कडधान्यांना प्राधान्य देत आहेत. खानावळ व्यावसायिक त्यांच्याकडील अनेक ग्राहकांकडून महिन्याचे पैसे अगोदरच घेतात. मात्र, भाज्यांच्या भावातील वाढीमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, काही व्यावसायिक भाजीऐवजी कडधान्याचा वापर करू लागले आहेत. चिंचवड येथील केटरिंग व्यावसायिक महेश खोले म्हणाले, ‘‘भाज्यांच्या भावातील वाढ यंदा दोन-तीन महिने टिकून आहे. भाज्यांच्या भावात वाढ झाली, तरी आर्थिक मंदीमुळे कंपन्या किमतीतील फरक देत नाहीत. त्यामुळे नफ्यात घट झाली आहे.’’

परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला. नवीन पीक येण्यास आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत भावातील तेजी कायम राहील, असे सध्याचे चित्र आहे.
-डॉ. किशोर सस्ते, शेतकरी-मोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com