"शेत-शिवारात घुमले  चाऊर...चाऊर चांगभले...' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सोलापूर - "चाऊर...चाऊर...चांगभले...पाऊस आला...चलभले' असा आवाज जिल्ह्यातील शेत-शिवारामध्ये बुधवारी घुमत होता. निमित्त होते वेळ अमावास्येचे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आलेल्या पिकामध्ये पाच पांडवाची पूजा करून अमावास्या उत्साहात साजरी केली. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगाम जोरात आहे. हंगामातील ज्वारी हे प्रमुख पीक चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीतून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे यंदाच्या वेळ अमावास्येच्या पूजेवेळी शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना होती. 

दिवाळीच्या पाडव्यादिवशी शेतामध्ये पाच पांडव घातले जातात. त्या पाच पांडवांची, मातीच्या ढिगाऱ्याची पूजा आज शेतकरी कुटुंबाकडून केली जाते. शेंगदाण्याच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. बाजरीच्या उंड्यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व असते. सायंकाळी घरी जाताना याच बाजरीच्या उंड्याची न्याहारी झाडाला बांधून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी ते उंडे शेतकऱ्यांनी खावेत, अशी आख्यायिका आहे. या पूजेच्यावेळी "मोरवा'ही (मडके) पूजला जातो. या मोरव्यामध्ये एक-दोन रुपयांचे नाणे व बाजरीचे उंडे टाकून तो जमिनीमध्ये पुरतात. सायंकाळी ज्वारीच्या उंच पाच ताटांची पाटी करून त्यामध्ये दिवा ठेवून ती पाटी घरी घेऊन येण्याची जुनी परंपरा आजही कायम असल्याचे दिसून येते. "हर...हर...महादेव'चा गजर करत सायंकाळच्या वेळी अनेक पाट्या गावात येतात. अनेक भागामध्ये "चाऊर' या शब्दाचा अपभ्रंश "चावड' असा झाल्याचे आढळून येते. 

गोड-धोडाबरोबरच अंबिलही 
कधीही शेतामध्ये न येणारे शेतकरी, नोकरदार वेळ अमावास्येच्या दिवशी आवर्जून शेतात येतात. या दिवशी पुरणपोळीसह इतर गोडधोड पदार्थ खाण्यासाठी तयार केले जातात. त्याचबरोबर जेवणाच्या शेवटी दह्यापासून केलेली अंबिलही वेगळीच चव देऊन जाते.

Web Title: vel amavasya celebration