‘नॅक’ मूल्यांकनात विदर्भ पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक’ मूल्यांकनासाठी मुहूर्त सापडलेला नाही.

अमरावती, नागपूर विभागातील ७५ संस्था प्रक्रियेपासून दूरच
पुणे - अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक’ मूल्यांकनासाठी मुहूर्त सापडलेला नाही. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील ७५ महाविद्यालयांचा समावेश आहे. सोलापूर विभागातील सर्व ४० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात २८ शासकीय महाविद्यालये आहेत, तर १ हजार १७७ अनुदानित महाविद्यालये आहेत. ‘नॅक’कडून मिळणाऱ्या श्रेणीवर महाविद्यालयाचे पुढील अनुदान, महाविद्यालयाच्या विस्तारासाठीच्या योजना राबविता येतात. ‘यूजीसी’कडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही महाविद्यालयांना मूल्यांकन आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली जाणारी संधी, सोयीसुविधा, इमारत, प्राध्यापकांची संख्या या सर्वांचा विचार करून ‘नॅक’कडून महाविद्यालयांना श्रेणी दिली जाते.

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..

राज्यातील २८ शासकीय महाविद्यालयांपैकी औरंगाबाद येथील १, मुंबईतील ३, नागपूर येथील १ अशा पाच महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही. राज्याच्या इतर भागांतील २३ महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले आहे. अनुदानित महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील १० विभागांपैकी अमरावती व नागपूर वगळता इतर विभागांतील मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अमरावती विभागात १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ३४ महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन केलेले नाही. नागपूर विभागात १९५ पैकी १५४ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. ४१ महाविद्यालयांमध्ये अद्याप ‘नॅक’चे पथक पोहोचलेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha behind in the Naac evaluation