Vidha Sabha 2019 : राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण

Vidha Sabha 2019 : राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई - राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या  आज (ता. 24) होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. 

मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू होईल. सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक, दोन सहायक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील पाच बूथच्या "व्हीव्हीपॅट'मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. "व्हीव्हीपॅट'मधील चिठ्ठीतील मते आणि आणि "ईव्हीएम'वरील मतांची पडताळणी या वेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे "इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट' (ईटीपीबी) मोजली जातील. 

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूमपासून "ईव्हीएम' ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूममधून मतपेट्या बाहेर काढणे, मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे, या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल. 

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूमला केंद्रीय सशस्त्र पोलिस, राज्य राखीव पोलिस आणि स्थानिक पोलिस, अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. 

मंत्रालयात "एलईडीवर' निकाल 
मंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या "एलईडी' स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच 'Voter Helpline' या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघांचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com