Vidha Sabha 2019: मतदारराजा आज ‘बरसणार’

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

तीन लाख पोलिसांसह निमलष्करी दले तैनात
तीन हजारांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य पणाला
केंद्रांचे लोकेशन गुगल मॅपवर दिसणार

विधानसभा 2019 : 
मुंबई-  सध्या राज्यभर वरुणराजा धुवाधार कोसळत असताना मतदारराजादेखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्या घराबाहेर पडणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (ता. २१) मतदान होणार असून, निवडणूक आयोगाची तयारीही पूर्ण झाली आहे. अपक्ष उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे तीन हजारांहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद होईल.

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून वातावरण तापायला सुरवात झाली होती. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भाजप- शिवसेना या दोन पक्षांची युती, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची आघाडी या निवडणुकीला सामोरे जात आहे. याव्यतिरिक्‍त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आदी पक्षांनी आपआपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार संघर्षात उडी घेतली होती.

सत्ताधारी भाजपने या निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करताना घटक पक्षांना काही जागा सोडल्या असून, त्यांचे उमेदवारही कमळाच्या चिन्हावर लढत आहेत. भाजप १६४ जागा लढवत आहे, तर शिवसेनेचे १२४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. काँग्रेस पक्ष १४७, राष्ट्रवादी काँग्रेस १२१ जागांवर लढत आहे, तर मनसे १०५, वंचित बहुजन आघाडी २३५, बसप २६२, एमआयएमचे ४४ असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अपक्षांसह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये कैद होणार आहे.

मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान
रविवार आणि मतदानाची अशा जोडून दोन सुट्या आल्या आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील मतदारांना मतदान केंद्रांवर खेचून आणणे हे विविध राजकीय पक्षांपुढील आव्हान असेल. जोडून दोन दिवस सुट्या आल्या की वीकएंडला मुंबई-पुण्याचे नागरिक बाहेर सहलीला जाणे पसंत करतात, त्यामुळे त्यांच्याकडून मतदान करून घेणे हे सर्वच राजकीय पक्षांपुढील दिव्य असते.

निवडणूक आघाडीवर
मतदान केंद्रांवर इंटरनेट बंद ठेवा : राष्ट्रवादी
सलग सुटी आल्याने पक्षांची धाकधूक वाढली
ईव्हीएमवर लक्ष ठेवण्याच्या शिवसेना नेत्यांना सूचना
गोंदियात ईव्हीएम नेणारी वाहने चिखलात रुतली
अकोल्यामध्ये अडीचशे प्रकारच्या साहित्याचे वाटप
मूर्तिजापुरात पोलिसांकडून मद्यासाठा जप्त
नाशिकमध्ये गुन्हेगारांची धरपकड
जळगावमध्ये कर्तव्यावरील दोन पोलिसांचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidha Sabha 2019 Voting for the Legislative Assembly today