गोटे यांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी गुरुवारी पुन्हा विधान परिषद रद्द करण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्याचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. गोटे यांचे वक्तव्य अशोभनीय असल्याची टिपण्णी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केली.

मुंबई - भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी गुरुवारी पुन्हा विधान परिषद रद्द करण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्याचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. गोटे यांचे वक्तव्य अशोभनीय असल्याची टिपण्णी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केली.

गोटे यांनी बुधवारी (ता.29) विधानसभेत ही मागणी केली असता त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढण्यात आले. आज औचित्याचे मुद्यावर पुन्हा गोटे यांनी त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. या पूर्वी रामभाऊ म्हाळगी, निहाल अहमद, राम कापसे यांनीदेखील बरखास्तीची मागणी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावर बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, विधानसभेत बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणाऱ्या सत्ताधारी पक्षाला विधान परिषदेची अडचण होत आहे. त्यामुळेच अनिल गोटे यांच्या माध्यमातून विधान परिषद सभागृहाचाच अवमान करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. विधान परिषद बरखास्त व्हावी, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे का?, विधान परिषदच नको असेल तर आम्ही इथे कामकाज तरी कशाला करायचे, असा सवाल मुंडे यांनी केला. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी तोपर्यंत सभागृह चालणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. कॉंग्रेसचे शरद रणपिसे, जनार्दन चांदूरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण पावसकर यांनीही गोटे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. अनिल गोटे यांच्या विधानाशी सरकारचा संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. तरीही त्यांना समज द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर, विधान परिषदेचे घटनात्मक अस्तित्व आणि महत्त्व असल्याचे तावडे म्हणाले. खालच्या सभोगृहातील काही विधेयके आम्ही संमत होऊ देणार नाही, अशी भाषा वरच्या काही सदस्यांनी अनिल गोटे यांच्याशी खासगीत बोलताना वापरली होती. त्यामुळे अनिल गोटे त्यांच्या जागी बरोबर असल्याचे विधान तावडे यांनी केले. त्यांच्या विधानावर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. हा तिढा न सुटल्याने सभागृहाचे कामकाज एकदा एका तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.

गोऱ्हे यांच्या भूमिकेचे स्वागत
राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. पुढे कोणत्या राजकीय घडामोडी घडतात यापेक्षा सभागृहाची गरिमा आणि सन्मान महत्त्वाचे आहे. त्यामुळे विधान परिषदेपेक्षा विधानसभा महत्त्वाचे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला एकजुटीने विरोध व्हायला हवा, अशी भूमिका शिवसेनेच्या नीलम गाऱ्हे यांनी मांडली. पुढील राजकीय सोयीसाठीच विधान परिषद सभागृहाविरोधात मोहीम चालविण्यात येत असल्याची भूमिका गोऱ्हे यांनी मांडल्याने विरोधी बाकांवरील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

Web Title: vidhan parishad reaction by gote talking