शिवसेनेचा झटका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - विधान परिषदेच्या सहापैकी आज जाहीर झालेल्या पाच जागांच्या निकालाने राज्यात आघाडी अथवा युतीची समीकरणं निव्वळ ‘देखावा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच जागांपैकी शिवसेनेला दोन, भाजप दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेच्या विजयाने मात्र भाजप व राष्ट्रवादीला इशारा असल्याचे मानले जात आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पाच मतदारसंघांचे आज धक्‍कादायक निकाल लागले. विदर्भात भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागा जिंकल्या. मात्र वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असतानाही काँग्रेस उमेदवाराने मोठी मते घेतल्याचे आश्‍चर्य मानले जाते, तर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांच्यावर मात केली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेस सोबतच भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता.

त्यामुळे संख्याबळानुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित मानला जात होता. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराने अपेक्षेहून अधिक मते घेत राष्ट्रवादी आघाडीला दणका दिला. मागील निवडणुकीत या मतदारसंघात एकही जागा शिवसेनेला मिळालेली नव्हती. त्यामुळे विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ दोनने वाढले आहे. 

परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही शिवसेनेने स्थानिक उमेदवार न देता विजय मिळविला. राष्ट्रवादीने कोकणात विक्रमी मताने विजय मिळविला. पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्या व्यक्तिगत संबंधांमुळे काँग्रेसह नारायण राणे, भाजपने अनिकेत तटकरे यांना मदत केली. भाजप व शिवसेनेची मते या मतदारसंघात एकत्र आली असती, तर चित्र पालटले असते. मात्र, भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला धक्‍का दिल्याची चर्चा आहे.

अमरावती मतदारसंघात भाजपच्या प्रवीण पोटे यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. परभणीत शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी बाजी मारली. तर वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद भाजप उमेदवार रामदास आबंटकर यांनी विजय मिळवत गड कायम राखला. 

Web Title: vidhan parishad result shivsena politics