Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीचा डाव उलटला; महायुतीतही बंडखोरी

दत्ता देशमुख
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

शिवसंग्राम आणि रिपाइंचा आग्रह कानानिराळा टाकतानाच विद्यमान आमदारांना विश्रांतीचे धाडस भाजपनेत्या पंकजा मुंडेंनी दाखविले आहे. राष्ट्रवादीने अगोदरच आपले उमेदवार जाहीर केले. पण, त्यापैकीच उमेदवाराला भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देऊन भाजपने राष्ट्रवादीवर डाव उलटवलाय. परंतु, बंडखोरी महायुतीची डोकेदुखी ठरणार आहे. परळीत मुंडे भावंडे आणि बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्या लढत चर्चेची की खरोखरच चुरशीची होते, याकडे लक्ष आहे.

विधानसभा 2019 
जिल्ह्यात सहापैकी पाच उमेदवार जाहीर कररून राष्ट्रवादीने आघाडीचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. केजच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडांनी भाजपमध्ये प्रवेशत त्यांच्याकडून उमेदवारीही मिळविली. तर शिवसंग्राम, रिपाइंची मागणी आणि शिवसेनेच्या वाढलेल्या भुकेकडे काणाडोळा करून भाजपने घोडे दामटले आहे. आमदार संगीता ठोंबरेंना विश्रांती दिली. आता आर. टी. देशमुख आणि भीमराव धोंडेंचे काय हे दोन दिवसांत कळेल. ‘इलेक्‍टिंग मेरीट’वर विद्यमान आमदारांच्या जागी भाजपची उमेदवारी मिळविण्यात मुंदडांना मिळालेल्या यशाने रमेश आडसकरही त्या माळेत जाऊ शकतात. 

मुंडेंच्या परळी बालेकिल्ल्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे दुसऱ्यांदा आमने-सामने राहतील. ही निवडणूक दोघांच्याही राजकीय वाटचालीत निर्णायक ठरणार आहे. पारंपरिक जागा राष्ट्रवादीने घेतल्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरही बरेच अवलंबून आहे. ‘वंचित’ने येथून धनगर समाजातील भीमराव सातपुतेंना रिंगणात उतरवलेय. महायुतीतील घटकपक्ष शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंचा बीड मतदा संघावरील दावा फेटाळला गेला. मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून त्यांचे पुतणे संदीप असतील. ‘एमआयएम’ने शेख शफीक तर ‘वंचित’ने अशोक हिंगेंना मैदानात उतरवलेय. मतविभागणी हेच निकालाचे गणित आहे. 

इथे भाजपजन क्षीरसागरांना पंकजा मुंडेंचे स्पर्धक मानत असल्याने त्यांची आणि मेटेंची भूमिका महत्त्वाची असेल. माजलगावात भाजपचे आमदार आर. टी. देशमुखांना विश्रांती दिली असून, तेथून आंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकरांना उमेदवारी दिली आहे. स्पर्धेतील छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी ‘भविष्यात सन्मान’ या शब्दाकडे काणाडोळा करीत अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठतेसह केज सुरक्षित करण्याबरोबरच परळीला हातभार यामुळे आडसकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंकेंची अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. ‘वंचित’कडून रविकांत राठोड उमेदवार आहेत. गेवराईतून भाजपचे आमदार लक्ष्मण पवारच उमेदवार आहेत. तर, राष्ट्रवादीने विजयसिंह पंडितांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत जोरदार मेगाभरतीही सुरू आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडितांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे. इथे मोठी मते असलेल्या धनगर समाजाचे विष्णू देवकते ‘वंचित’कडून रिंगणात आहेत. देवकतेंची उमेदवारी आणि बदामराव पंडितांची बंडखोरी भाजपची डोकेदुखी ठरेल. केजमध्ये आता राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठेंचे नाव आघाडीवर आहे. ‘वंचित’कडून अजिंक्‍य चांदणे उमेदवार आहेत. आष्टीतही भाजपने आमदार भीमराव धोंडेंना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखवला आहे. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. ‘वंचित’चे नामदेव सानप उमेदवार आहेत.

युतीत शिवसंग्राम, रिपाइं उपेक्षित.
भाजपने केज आणि माजलगावमध्ये आमदारांचे तिकीट कापले.
राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा भाजपच्या उमेदवार.
आघाडीत काँग्रेसला कोणती जागा याकडे लक्ष.
शिवसेनेच्या बदामराव पंडितांची बंडखोरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 beed district NCP and Bjp politics