Vidhan Sabha 2019 : ‘त्यादिवशी शिवसेनेचा विषय संपेल’; भावासोबतच्या मतभेदानंतर नितेश राणेंचे ट्विट

टीम ई-सकाळ
Monday, 14 October 2019

काल नितेश राणे यांनी ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे, असे म्हटले होते.

मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले.

पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश राणे यांनी ट्विट करून या वादावर पडदा टाकलाय. 

निलेश राणेंचे स्पष्टीकरण काय?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांमध्ये मतभेद असल्याचे काल ट्विटरवर पाहायला मिळाले. त्यानंतर आज (ता.14) निलेश राणे यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून, मीडियाने त्याचा गैरअर्थ काढला असे म्हटले आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेच्या बाजूने ट्विट केल्यामुळे त्यांचे बंधू निलेश राणे यांनी त्याला विरोध केला होता.

निलेश राणेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल, त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.''

काय म्हणाले होते,  नितेश राणे?

नितेश राणे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून उमेदवारही देण्यात आली. त्यानंतर काल नितेश राणे यांनी ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे, असे म्हटले होते.

नितेश हे कणकवली मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. युती असूनही शिवसेनेने नितेश यांच्या विरोधात सतीश सावंत यांना कणकवलीमधून उभे केले आहे. त्यामुळे सेना-भाजप या युतीपक्षांमध्ये चुरस वाढली आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : निवडणुकीत 9673 केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट

- सौरव गांगलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती; जय शहा सचिव

- अर्थव्यवस्थेचा कचरा करणाऱ्या सरकारला धडा शिकवा : डॉ. अमोल कोल्हे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Nilesh Rane clarification tweet about Nitesh rane