Vidhan Sabha 2019 : युतीचे ‘ठाणे’ भक्कम

राजेश मोरे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

ठाणे जिल्ह्यावरील शिवसेना, भाजपची पकड घट्ट आहे. त्यातच पक्षांतराने आघाडी खिळखिळी; तर शिवसेना व भाजप अधिक बलवान, असे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात मात्र युतीला सक्षम उमेदवार शोधणे जड जात आहे.

विधानसभा 2019 
ठाणे जिल्ह्यावरील शिवसेना, भाजपची पकड घट्ट आहे. त्यातच पक्षांतराने आघाडी खिळखिळी; तर शिवसेना व भाजप अधिक बलवान, असे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात मात्र युतीला सक्षम उमेदवार शोधणे जड जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल १३ जागांवर युतीचे आमदार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांनी शिवसेना-भाजपची वाट धरली. काँग्रेसला गत निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे युतीचा ठाण्यातील बालेकिल्ला भक्कम बनला आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित लढत द्यायचे ठरविले, तरी अनेक विधानसभा मतदारसंघांत उमेदवार मिळविताना त्यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील पक्षबदलाचा वारू ठाणे जिल्ह्यातही आला आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांच्यासह त्यांचे आमदारपुत्र संदीप नाईक यांनी भाजपची वाट धरली, पालघरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी अद्याप राष्ट्रवादीतच असल्या, तरी त्यांचे पुत्र ओमी कलानी यांचे भाजपशी सख्य जमले आहे. अशावेळी विधानसभेच्या निवडणुकीत ओमी हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. मात्र, भाजपचे जुने कार्यकर्ते अद्यापही माजी आमदार कुमार आयलानी यांच्यासोबत असल्याने श्रेष्ठींची येथे उमेदवारी वाटपात पंचाईत होणार आहे. 

जिल्ह्यात केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने राष्ट्रवादीचा एक आक्रमक चेहरा शिल्लक राहिला आहे. इतर ठिकाणी उमेदवार शोधताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर अडचणी असताना आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात मात्र वेगळे चित्र आहे. येथे युतीवर उमेदवाराच्या शोधात तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.

मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांच्याकडून ठाणे, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पश्‍चिम या मतदारसंघात चांगली लढत दिली जाण्याची शक्‍यता आहे.शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील आमदार पालकमंत्री एकनाथ शिंदे, भिवंडी पश्‍चिमचे रूपेश म्हात्रे, भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे, अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर, डोंबिवलीतील भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भिवंडी पूर्वचे महेश चौगुले यांना पुन्हा संधी मिळेल. मात्र, इतर काही मतदारसंघांत किरकोळ बदलाची शक्‍यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभव केला असला, तरी या वेळी बेलापूर मतदारसंघातून भाजपतर्फे नाईक यांनाच संधी मिळण्याची शक्‍यता आहे.ऐरोली मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पण, येथे आता राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा मतदारसंघ कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता आहे. 

ठाण्यात भाजपचे संजय केळकर आमदार आहेत. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना मिळावा, यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. ओवळा माजीवडा येथून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक रिंगणात उतरण्याची शक्‍यता  आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Thane Constituency