उपसभापतिपदी डॉ. गोऱ्हेंचा मार्ग सुकर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जून 2019

विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राहणार आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राहणार आहे. विधान परिषदेत उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती उद्या जाहीर केली जाणार असल्याची दाट शक्‍यता आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करा, असे पत्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना गेल्या आठवड्यात दिले. त्याचवेळी भाजप - शिवसेनेने उपसभापतिपद आम्हाला द्या, नाहीतर वडेट्टीवार यांना हे पद देणार नाही, असे सांगत आघाडीचे नाक दाबले होते. विरोधी पक्षनेतेपद गमवायचे की उपसभापतिपद, हा पेच काँग्रेससमोर होता.

अखेरीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते कायम ठेवत संख्याबळ असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने परिषदेच्या उपसभापतिपदावर पाणी सोडले.
विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपल्याने काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना उपसभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पक्षाने पुन्हा संधी न दिल्याने माणिकराव ठाकरे पक्षावर नाराजही होते.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात माणिकरावांनी राजीनामा दिला होता. त्याला अकरा महिने उलटून गेल्यानंतरही काँग्रेसकडून उपसभापतीच्या निवडणुकीसाठी काहीच हालचाल होत नव्हती. अखेरीस लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे विरोधीपक्षनेतेच भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने काँग्रेसची कोंडी करण्याची नामी संधी भाजपकडे चालून आली. शिवसेनेला उपसभापतिपद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खेळी खेळत या दोन्ही नियुक्‍त्या एकाच दिवशी जाहीर होतील अशीच विधानसभा आणि परिषदेच्या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. उद्याच सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. काँग्रेसने माघार घेतली असल्याने उपसभापतिपदाची घोषणा बिनविरोध होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhanparishad deputy chairman shivsena neelam gorhe politics