अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत बगल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मार्च 2017

शिवसेना आमदारांचा तीव्र विरोध

शिवसेना आमदारांचा तीव्र विरोध
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांचा गोंधळ व त्यातून 19 विरोधी आमदारांचे निलंबन यामुळे आक्रमक सरकारने बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चा व लेखानुदान चर्चेविनाच मंजूर केले. यामुळे शिवसेना आमदार कमालीचे संतापल्याची घटना विधानसभेत घडली. मात्र हे केवळ लेखानुदान व तातडीच्या खर्चाचे विधेयक असल्याने अर्थसंकल्पातील बाबनिहाय चर्चा होणार असून, त्या वेळी सर्वच आमदारांना अर्थसंकल्पावर मते मांडता येतील, असे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला भाजप आमदार राजेंद्र पटनी यांनी सुरवात केली. कालपासून (ता. 22) सुरू असलेली चर्चा पुढे सुरू करताच पाटणी यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थांबवले व लेखानुदान मंजूर करण्याची विनंती केली. शिवसेना आमदार विजय औटी यांनी विरोध केला. चर्चेविना विनियोजन मंजूर करताच कसे, असा सवाल करत ही लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र, मंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका करत अर्थसंकल्प राज्यातील जनतेच्या हिताचा असून, सदस्यांच्या मागण्यांचा विचार पुढील अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये निश्‍चितपणे केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर 2017-18 चा लेखाअनुदान प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhansabha budget discussion stop