Vidhansabha 2019 : विस्कटलेला संसार सावरायचा कसा?

श्रीमंत माने
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

काँग्रेसची आगामी दिशा... 

  • उरलेसुरले बालेकिल्ले वाचवायचे.
  • पक्षांतरातून गळतीचे प्रमाण किमान ठेवायचे 
  • वंचित बहुजन आघाडीचा फटका चुकवायचा. 
  • विदर्भ, मराठवाडा, कोकणात संघटन बांधायचे.
  • मुंबई आणि अन्य शहरांमध्ये जुने यश मिळवायचे.

अनेक माजी मुख्यमंत्री, मंत्री असलेल्या काँग्रेस पक्षाने आत्मविश्‍वास गमावला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्ष किती संघटितपणे, आक्रमकरीत्या विरोधकांना सामोरा जातोय, युवकांमध्ये पक्षाचा अजेंडा घेऊन जातो आणि छाप पाडतो, यावर पक्षाची कामगिरी अवलंबून असेल.

नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असतानाही काँग्रेसला गेल्या विधानसभा निवडणुकीत ४२ जागा मिळाल्या. असे मानले जाते, की सहकारातील दबदबा आणि अन्य कारणांनी ते पक्षाचे बालेकिल्ले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचेही बहुदा असेच आहे. परंतु आता पक्षांतराच्या लाटेत हे बालेकिल्लेच ढासळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलाच्या खासदारकीसाठी पक्ष सोडला आणि गळती सुरू झाली. ती थांबण्याचे नाव घेईना. गेल्यावेळच्या जागा दुप्पट करणे, हे दोन्ही काँग्रेसचे स्वप्न आहे आणि घाऊक पक्षांतराचा विचार केला, तर ते दिवास्वप्न ठरण्याचीच अधिक शक्‍यता आहे. 

विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात काँग्रेसपुढील आव्हान अधिक मोठे आहे. गेल्या वेळी ११ जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची पाटी कोरी राहिली. त्यात यवतमाळ, भंडारा, गडचिरोली विदर्भातील, जालना, बीड, परभणी मराठवाड्यातील तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी कोकणातील. नंतर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशामुळे तांत्रिकदृष्ट्या सिंधुदुर्गही हातातून गेला. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाच पराभव झाला. शिवसेनेतून पक्षात आलेल्या बाळू धानोरकरांच्या चंद्रपूरमधल्या विजयाने राज्यात पाटी कोरी राहण्याची नामुष्की टळली. पक्षाने विखेंचे शेजारी, संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या जोडीला डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, बसवराज पाटील आणि विश्‍वजित कदम अशा पाच कार्याध्यक्षांना नेमण्यात आले. परंतु या टीमला पक्षाचा राज्यात विस्कटलेला संसार सावरण्यासाठी अवघा एक महिना मिळालाय. तीन-तीन माजी मुख्यमंत्री आणि अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांची फळी असलेल्या पक्षात अनेकांचे अहंकार जोपासत, रुसवेफुगवे काढत गेल्या महिनाभरात बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून संघटनेत जीव ओतण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु सगळ्या मेळाव्यांमध्ये निवडणुकीनंतरच्या पक्षबांधणीवरच थोरात अधिक बोलताहेत. पालवी फुटण्यासाठी झाडाच्या फांद्या तासाव्याच लागतात. कठीण समयी पक्ष सोडून जाणाऱ्यांमुळे ती पालवी फुटेल, असा विश्‍वास व्यक्‍त करताहेत. 

मामा-भाच्यावर मदार 
खरे पाहता पक्षाच्या पुनरुज्जीवनाची मदार मामा-भाच्यावर आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे थोरातांचे भाचे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात तरुण-तरुणींची फळी अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवकांच्या संघटनेतील मरगळ दूर होईलही. खरी अडचण आहे ती प्रौढ काँग्रेसजनांमध्ये विश्‍वासाचा अभाव असल्याची आणि सोबतच तळागाळात आक्रमक ‘फूटशोल्जर्स’ नसण्याची. प्रयत्न असे सुरू आहेत, की राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी कायम ठेवून लढतानाच राजकीय विश्‍वासार्हता तुलनेने काँग्रेसमध्ये अधिक असल्याचा मुद्दा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवायचा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Congress Balasaheb Thorat Rahul Gandhi Politics