Vidhansabha 2019 : काँग्रेससोबत युती नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

योग्य निर्णय घ्यावा - जलिल
औरंगाबाद - ‘वंचित बहुजन आघाडीची ‘एमआयएम’शी कुठलीही बोलणी सुरू नाही. राज्यात वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीला सुवर्णसंधी आहे. अजूनही वेळ गेली नाही, अशावेळी एमआयएमला झुलवत ठेवण्यापेक्षा योग्य निर्णय घ्या’, अशी विनंती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी  ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पत्रकार परिषदेत केली. सध्याची परिस्थिती बघता ‘वंचित’ला आरएसएसची फूस आहे का? अशी शंका येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एमआयएमसोबतच्या आघाडीची बोलणी आम्ही पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्याशीच करू, इम्तियाज जलील यांना ते अधिकार नाहीत असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजूनही आमची युती कायम असल्याचे स्पष्ट केले होते.

मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नसल्यावर वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिक्‍कामोर्तब केले. काँग्रेससोबत चर्चेची दारे बंद करण्यात आली असली तरी ‘एमआयएम’सोबत मात्र शेवटपर्यंत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आघाडीत घेण्याची तयारी दाखवणाऱ्या ‘वंचित’ने काँग्रेसला खिजवण्याची एकही संधी सोडली नसल्याने काँग्रेसने ‘वंचित’ला फार दाद दिली नव्हती. ‘वंचित’ने घातलेल्या अटींना काँग्रेसने फार दाद न दिल्याने अखेरीस काँग्रेससोबत यापुढे चर्चा करणार नसल्याचे ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार आव्हान दिले होते. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केले होते. मात्र, ‘राष्ट्रवादी’ला वगळून काँग्रेससोबत युती व्हावी, असा आग्रह ‘वंचित’चा होता. तसेच विधानसभा निवडणुकीत ५० टक्के जागांची मागणी केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस आज काँग्रेससोबत युती होणार नसल्याचे आंबेडकरांनी जाहीर केले. ‘वंचित’ने युतीसाठी काँग्रेसपुढे जाचक अटी ठेवल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Congress Yuti Prakash Ambedkar Politics