राज्यात २५ जागांवर मुस्लिम उमेदवार - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

ईव्हीएम हॅकिंग शक्‍य
मतपत्रिका इतिहासजमा झाल्या असून, ‘ईव्हीएम’वरच निवडणुका घेणार असल्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. ‘ईव्हीएम’विरोधात उच्च न्यायालयात ४१ याचिका दाखल झाल्या आहेत. ‘ईव्हीएम’ हॅक करता येत नाही, हे आयोगाने न्यायालयासमोर सिद्ध करून दाखवावे. हॅकिंग शक्‍य असल्याचे आम्ही सिद्ध करून दाखवू. याप्रकरणी आयोग पळ काढत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान २५ जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

‘एमआयएम’सोबत आघाडीसाठी चर्चा सुरू असून, आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष लोकसभेपूर्वी एकत्र आले होते. विधानसभेतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून एमआयएमने ‘वंचित’चा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी किमान २५ जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. ‘वंचित’ला ऑल इंडिया उलेमा बोर्डानेही आज सशर्त पाठिंबा जाहीर केला.

‘वंचित’ची सत्ता आल्यास मुस्लिमांना शिक्षणात दहा टक्के आरक्षण, वक्‍फ बोर्डाच्या अतिक्रमित जमिनी बोर्डाला परत करणे, मॉब लिंचिंगविरोधात कठोर कायदा बनविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उलेमा बोर्डाने ‘वंचित’ला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उलेमा बोर्डाशी चर्चा करूनच २५ मुस्लिम उमेदवारांची नावे ठरवली जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

एमआयएमसोबतच्या आघाडीबाबत विचारले असता, त्यांनी दरवाजे बंद केले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडेच आहेत. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, हीच आमची भूमिका असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Muslim Candidate Prakash Ambedkar Politics