विधानसभा निवडणुकी संदर्भात सुप्रिया सुळे व राहुल गांधींमध्ये चर्चा

मिलिंद संगई
बुधवार, 26 जून 2019

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्ये आज दिल्लीमध्ये पाउण तास सविस्तर चर्चा झाली.

बारामती शहर - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्ये आज दिल्लीमध्ये पाउण तास सविस्तर चर्चा झाली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती व आगामी विधानसभा निवडणूक यासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या टंचाईची परिस्थिती भीषण असून जलशिवार युक्त अभियानामध्ये झालेला गैरव्यवहार व इतर बाबी या सविस्तरपणे सुळे यांनी राहुल गांधी यांच्या कानावर घातल्या.

यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राहुल गांधी यांच्याशी सुळे यांनी प्राथमिक चर्चा केली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस व राष्ट्रवादी यांची रणनीती काय असली पाहिजे या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे सुळे यांनी सांगितले.

संसदेच्या आवारामध्ये ही भेट झाली. राज्यातील दुष्काळ, दुष्काळाच्या परिस्थितीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करायच्या व लोकांना दिलासा देण्यासाठी काय करता येईल याबाबत राहुल गांधी यांनी चौकशी केली ,असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणूक अधिक एकीने लढवावी ह्या दृष्टीकोनातून ही चर्चा आशादायी असल्याचे सुळे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Rahul gandhi Supriya Sule Discussion Politics