Vidhansabha 2019 : विधानसभेच्या ४९ जागा लढविणार - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ‘लोकमंगल माउली शुगर इंडस्ट्रीज’ या साखर कारखान्याने उसाच्या एफआरपीची रक्कम दिली नाही, त्यामुळे बीडमधील शेतकरी सतीश सोनावणे यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचे टाळले आहे. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत आणि याबाबतची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

पुणे - ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

‘विधानसभेची निवडणूक मी लढणार नसून पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल,’’ असे सांगून त्यांनी निवडणूक लढविण्याच्या विषयावर पडदा टाकला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, दशरथ सावंत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह सदस्य उपस्थित होते. पुणे येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पूजा झोळ यांच्यासह ६० हून अधिक तरुणांनी स्वाभिमानी युवा आघाडीत प्रवेश केला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या सूत्रानुसार हमीभाव जाहीर करावा. महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा आर्थिक विकास दर उणे आठ टक्के झाला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने विनाअट सरसकट सातबारा कोरा करून शेतीचे वीजबिल माफ करावे. दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यातील पीकविमा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची जोखीम रक्कम तत्काळ द्यावी. २० जुलैपूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज देण्यास बॅंकांना आदेश द्यावेत, आदी ठराव मंजूर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 raju Shetty 49 Seats Politics