Vidhansabha 2019 : शिवसेना 135 जागांवर ठाम, भाजप म्हणतो 115 पुरेत

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे तरी कसे, असा प्रश्‍न केला आहे.

मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे तरी कसे, असा प्रश्‍न केला आहे.

समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम आहे. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या जागा समसमान वाटू, या शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर काय द्यावे, याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 18 जागा बाजूला झाल्यास उर्वरित 270 जागा निम्म्या-निम्म्या वाटण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत समसमान जागावाटपाचे आश्‍वासन दिले असल्याने ही संख्या योग्यच असल्याचे शिवसेनेने भाजपला अनंत चतुर्दशीच्या रात्री कळवले आहे. शिवसेनेच्या आग्रही मागणीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना कळवली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशासाठी उद्या दिल्लीतील प्रत्यक्ष भेटीत या संबंधात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. अपक्ष म्हणून रिंगणात दाखल होणाऱ्या 18 जणांमागे भाजपच असल्याचेही शिवसेनेचे मत आहे.

शिवसेनेची 135 जागांची मागणी अवास्तव असल्याचे भाजपचे प्रथमदर्शनी मत आहे. शिवसेनेला आजची ताकद लक्षात घेता 115 पेक्षा जास्त जागा द्यायच्या तरी का, असा प्रश्‍न फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पडला आहे. भाजपची घोडदौड लक्षात घेता किमान 155 मतदारसंघांत लढणे आवश्‍यक असल्याचे पक्षाला वाटते. बाहेरून आलेली आमदार मंडळी सामावून घेण्यासाठी एवढे मतदारसंघ लढवणे आवश्‍यक असल्याचे नेत्यांना वाटते.

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री?
दरम्यान, नाराज शिवसेनेला चुचकारण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरे यांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन देण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. मात्र आम्ही तडजोड करणार नाही असे शिवसेनेने कळवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Shivsena BJP Yuti Seats Politics